तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथील समस्त लाडसा कलाल समाजाचे एकदिवसीय अधिवेशन रविवारी आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात लग्न वेळेवर न लावणाऱ्या वधू वर पित्यास ११ हजार रुपयांच्या दंड. लग्नानंतर काही कालावधीच घटस्फोट होणाऱ्या प्रकारांना आळा घालणे. अंत्यविधीच्या वेळी विधवाच्या बांगड्या न फोडणे. व प्रथम दिवसाचा खर्च समाजपंचाने करणे. असे आठ ठराव अधिवेशनात सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहेत. कलाल समाजाने घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयाचे समाजातून कौतुक केले जात आहे.

तळोदा येथील नवीन मंगल कार्यालयात समाजाचे अधिवेशन घेण्यात आले होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी धुळे येथील समाज अध्यक्ष मधूकरसा कलाल होते. प्रमुख अतिथी नाशिक विभागीय सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त राजेंद्रसा कलाल, तळोदा समाज अध्यक्ष संजयसा कलाल, चोपडा येथील समाज अध्यक्ष संजयशेठ कानडे, हातेड येथील चंद्रशेखरशेठ कानडे, सुरत येथील अध्यक्ष मनीषसा कलाल, धुळे येथील अध्यक्ष मधुकरसा कलाल, भुसावळ येथील अध्यक्ष प्रदीपसा कलाल, शहादा येथील गणेशसा सोनवणे, राजेंद्रसा कलाल, शिरपूर येथील अध्यक्ष जगदीशसा कलाल, शिरपूर येथील महिला अध्यक्षा मनीषा बागुल,आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाजाने आता या संगणक युगात जुन्या रूढी व परंपरा, चालीरीती यावर आळा घालून चांगल्या परंपरा जोपासण्याचे आवाहन करून वधूपित्यांनी केवळ नोकरी करणाऱ्या वराचा विचार न करता जे मुलं होतकरू ,मेहनती, व्यावसायिक, शेतकरी असतील अश्या उपवरांचाही विचार करण्याचे आवाहन केले. कारण सध्या नोकऱ्यांच्या संध्या खूपच कमी झाल्या आहेत. त्यामुळे नोकरी करणाऱ्या उपवरांचे प्रमाण देखील कमी झाले असल्यामुळे सकारात्मक विचार करण्याचे आवाहन उपस्थितांनी केले. यावेळी जगदीशसा कलाल, राहुलसा सोनवणे, राजेंद्रसा कलाल, चंद्रकांतशेठ कानडे, राजेंद्रसा कलाल, महेंद्रशेठ कानडे, आदींनी मनोगत व्यक्त केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजयसा कलाल यांनी तर सूत्रसंचलन दिलीपसा गिरनार यांनी तर आभार समाज पंच चेतनसा इंगळे यांनी मानले. अधिवेशनात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, चोपडा, सुरत, ठाणे, येथील समाज अध्यक्ष व समाज पंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनासाठी तळोदा पंचमंडळाचे अध्यक्ष संजयसा कलाल, उपाध्यक्ष महेंद्रसा कलाल, सचिव मनीषसा कलाल, सहसचिव मनोजसा कलाल, दिलीपसा गिरणार, विशालसा कलाल, वासुदेवसा कलाल, शशिकांतसा कलाल, बबनसा कलाल, जगदीशसा कलाल, विनोदसा कलाल, राजेंद्रसा कलाल, प्रकाशसा कलाल, धनंजयसा कलाल, मुकेशसा कलाल, प्रकाशसा मनोहर कलाल, प्रकाशसा कलाल, पंकजसा कलाल, विलाससा कलाल, चेतनसा कलाल, विनायकसा कलाल, जयंतसा कलाल आदींनी परिश्रम घेतले होते.
अधिवेशनात मंजूर झालेले ठराव
१. वेळेवर लग्न न लावणाऱ्या वर वधू पित्यास ११ हजार रुपयांचा दंड
२. लग्न झाल्यानंतर काही कालावधीतच घटस्फोट होणाऱ्या प्रकारांना आळा घालावा
३. मयताच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विधवा महिलेने बांगड्या न फोडणे, प्रेताभोवती एकच फेरी मारणे.
४. मयताच्या ठिकाणीचा खिचडी चा त्यादिवसाचा खर्च व्याहीनीच करावा त्याला फक्त सहकार्य म्हणून पंचमंडळी व महिला मंडळ करेल.
५. द्वार दर्शनाच्या वेळी चहापान बंद करावे
६. मयताचे अकराव्याच्या दिवशी अकरा पित्तर न बसवता एकच पित्तर बसवावा.
७. इतर सुतकिना टोप्या न घालता अग्निडाग दिलेल्या व्यक्तीसच टोपी चढविण्यात यावी.
८.अकराव्या दिवशी गोपूजन बंद करण्यात यावे.








