तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथे आदर्श विवाह संपन्न झाला. भावाच्या निधनानंतर वैधव्याचा सामना करणार्या भावजाईला दिराने एका अपत्यांसह स्विकारून मराठा समाजात आदर्श घडवून आणला. या विवाहाचे समाजाने स्वागत करून त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या. तसेच चिनोदासह सर्वत्र या आदर्श विवाहाचे कौतुक करण्यात येत आहे.

तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील कै.तापीराम श्यामराव सुर्यवंशी व सरलाबाई सुर्यवंशी यांचा जेष्ठ मुलगा नितिन सुर्यवंशी हे आपली वडिलोपार्जित शेती करून संसाराचा गाडा ओढत होते. विवाहानंतर सुखाचा संसारात एक मुलगी लाभली. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर असावे. लग्नाच्या चार वर्षानंतर नितिन याचा अल्पशा आजाराने सन २०२० यावर्षी त्यांचे अचानक निधन झाले. मुलाच्या निधनानंतर सुनेचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सुर्यवंशी परिवाराने सांभाळ केला. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षात वैधव्य आलेल्या आराध्या समोर पितृछत्र हरपलेल्या चिमुरड्या मुलीचे पालन पोषणासह तिच्या शिक्षणाचे आव्हान समोर उभे राहिले. तर घरात आराध्याचा लहान दीर किरण याच्यासाठी घरात वधु संशोधन सुरु असतांना यावर सासु सरलाबाई सुर्यवंशी यांनी पुढाकार घेवुन आराध्याचा विवाह स्व.नितिन सुर्यवंशी याचा लहान बंधू किरणशी करावा असा प्रस्ताव मांडला त्यावर आराध्याचे वडील राजेंद्र भिकाजी कदम यांनी विवाहास संमती दिली. किरण सुर्यवंशी याने आपल्या भावाच्या मुलीचा विचार करत तिला वटवृक्ष होवून सावली देण्याचा आपल्या भवजाईशी विवाह करण्याचा धाडसी निर्णय घेतला. किरण सुर्यवंशी हा अविवाहित असतांना देखील सुध्दा आपली एक पुतणीसह वहिनी सोबत लग्नाला मान्यता दिल्याने दि.२९ नोव्हेंबर २०२१ रोजी चिनोदा येथे साध्या पद्धतीने समाजातील जेष्ठ मंडळीच्या प्रमुख उपस्थितीत विवाह लावण्यात आला.
यावेळी या विवाह सोहळयात त्र्यंबकराव मराठे, माधवराव मराठे, डिगंबर मराठे, भानुदास मराठे, महेंद्र मराठे, बबन मराठे, सुपडू मराठे, रविंद्र पवार, रणधीर मराठे, रामकृष्ण मराठे, अरूण चव्हाण, सतिश मराठे, जितेंद्र मराठे, गणेश मराठे, अमृत मराठे, प्रकाश मराठे, निलेश मराठे, कपिल मराठे, चंद्रकांत पवार, गजेंद्र मराठे, सतिश मराठे, तुकाराम सुर्यवंशी, राजेंद्र कदम, संजय कदम व परीवारासह, नातेवाईक मराठा समाजातील जेष्ठ मंडळी, मित्रपरिवार उपस्थित होते. वैधव्यात जीवन जगणार्या वहिनीला सौभाग्याचा आधार दिल्याने सर्वत्र या आदर्श विवाहाचे कौतुक करण्यात येत आहे.








