नंदुरबार l प्रतिनिधी
ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे नाशिक विभागीय माजी अध्यक्ष मार्तंडराव व्यंकटेश जोशी यांचे काल बुधवारी रात्री पुण्यात निधन झाले. गुरुवारी सायंकाळी ग्राहक पंचायत आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघातर्फे सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. माणिक चौकातील दिगंबर जैन मंदिराच्या सभागृहात आयोजित शोक सभेप्रसंगी जेष्ठ सदस्य सुरेश जैन यांनी स्व. मार्तंडराव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात अँड. मोहन बोडस यांनी स्व. मार्तंडराव जोशी यांच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले की, बाबा जोशी उत्तम वक्ता, लेखक, संघटक, शिक्षक आणि मार्गदर्शक असे पंचसूत्री असलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी ग्राहक चळवळ राज्यभर रुजविली. या श्रद्धांजली सभेत सूत्रसंचालन ग्राहक पंचायत आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केले. श्रद्धांजली सभेप्रसंगी सुरेश जैन, ऍड. मोहन बोडस, ऍड. निलेश देसाई, डॉ. गणेश ढोले, योगेश्वर जळगावकर, वैभव करवंदकर, नितीन पाटील, महादू हिरणवाळे, प्रसाद अर्थेकर, रघुनाथ अहिरे, आदींसह ग्राहक पंचायत आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.








