नंदुरबार l प्रतिनिधी
लघुबंधारे बांधकाम पुर्ण केलेल्या कामांची 10 टक्के सुरक्षा अनामत रक्कम धनादेश काढण्यासाठी अडीच हजाराची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या कनिष्ठ सहायक लोकसेवक गुप्तेश चंद्रकांत सुगंधी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मुळ तक्रारदार यांचा मोठा भाऊ विशाल यांना जिल्हा परीषद, नंदुरबार येथील लघु सिचन विभाग येथुन सन 2018-18 मध्ये जिल्हयात विविध ठिकाणी लघुबंधारे बांधकामाचे काम मिळालेले होते.तक्रारदार यांचा सिव्हील डिप्लोमा झालेला असल्याने भाऊ विशाल यास वरील कामकाजाकरीता शासकीय ठेक्याचे बांधकाम व इतर कामात योग्य ती मदत करतात.
तक्रारदार यांना मिळालेल्या कामापैकी पुर्ण झालेल्या कामाची बिले मिळालेली आहेत. परंतु सदर कामांचे बिलामधुन 10 टक्के कपात केलेली सुरक्षा अनामत रक्कम जिल्हा परीषद,लघु सिंचन विभागामार्फत सदर फाईलचे कामकाज पूर्ण झाल्यावर धनादेश स्वरुपात मिळणार आहे.
त्याकरीता तक्रारदार हे लघु सिंचन विभाग, नंदुरबार येथे जावून संबधीत आरोपी लोकसेवक कनिष्ठ सहायक गुप्तेश चंद्रकात सुगंधी यांना भेटून लघु बंधारे बांधकाम पुर्ण केलेल्या कामांची 10 टक्के सुरक्षा अनामत रक्कम धनादेश काढणेबाबत विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार यांना सांगितले की,तुमच्या बिलाचे फाईलचे काम मी करून देतो असे सांगून तक्रारदार यांच्याकडुन सदर काम करुन देण्याचे मोबदल्यात 2 हजार 500 रुपये लाचेची मागणी केलेली होती. त्यावरुन आरोपी लोकसेवक सुगंधे, कनिष्ठ सहायक (मंत्रा), लघुसिंचन विभाग,जिल्हा परीषद,नंदुरबार यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम आज दि.23 नोव्हेंबर रोजी पंच व साक्षीदार यांच्या समक्ष जिल्हा परिषद,नंदुरबार येथील लघु सिंचन विभागातील कार्यालयात स्विकारली असुन त्यांना पंच-साक्षीदारांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे.सदर कामगिरी सुनिल कडासने पोलीस अधिक्षक लाप्रवि नाशिक परिक्षेत्र नाशिक, सतिश भामरे अप्पर पोलीस अधिक्षक(अति. कार्यभार)लाप्रवि नाशिक परिक्षेत्र नाशिक व सुनिल कुराडे पोलीस उप अधिक्षक लाप्रवि धुळे (अति.कार्यभार नंदुरबार) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, समाधान महादु वाघ, पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी समाधान वाघ, पोहवा उत्तम महाजन, पोहवा संजय गुमाणे, पोहवा विजय ठाकरे, पोना मनोज अहिरे,पोना दिपक चित्ते,मपोना ज्योती पाटील,पोना नावाडेकर,चापोना महाले अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार पथकाने केली आहे.
नंदुरबार जिल्हयातील सर्व नागरिकांना कोणत्याही शासकीय- निमशासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी-कर्मचारी किंवा त्यांचे वतीने इतर खाजगी इसम लाचेची मागणी करीत असतील,तर अँटी करप्शन ब्युरो, नंदुरबार कार्यालयाशी दूरध्वनी नंबर (02564) 230009,व टोल फ्री क्र.1064 वर संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, नंदुरबार यांनी केले आहे.