नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यात खापर जवळ कोराई शिवारात औषधांच्या खोक्यांसमवेत लपवून नेला जाणारा सुमारे २६ लाख ३८ हजार २०० रुपयांचा विदेशी मद्यसाठ्यासह 38 मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातून गुजरातकडे नेल्या जाणाऱ्या अवैध मद्यसाठ्याविषयी तक्रारी असल्याने सीमावर्ती भागात तपासणी वाढवण्यात आली आहे . त्या अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांना गुप्त माहिती मिळाली त्यावरून त्यांनी अक्कलकुवा तालुक्यात खापर जवळ कोराई शिवारातील महादेव ढाबा परिसरात सापळा रचून नजर ठेवली . त्यावेळी (क्र.डी.डी. 01 ए. 9519 ) सहा चाकी आयशर संशयास्पद वाटल्यावरून चौकशी केली . चालक राम स्वरुप बिश्नोई याने औषधाचे खोके दाखवून औषधांच्या बिले व कागदपत्र सादर केले . त्यानंतर अधीक्षक राठोड यांनी कसून चौकशी करून गाडीचे सील तोडून तपासणी केली असता त्या गाडीत 2 हजार 372 बल्क लिटर विदेशी मद्य व 588 बल्क लिटर बियरसाठा लपवलेला आढळून आला . गोवा राज्यात निर्मित केलेला व गोवा राज्यात विक्रीची मान्यता असलेला परंतु महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला हा मद्यसाठा २६ लाख ३८ हजार २०० रुपयांचा विदेशी मद्यसाठ्यासह ३८ लाखाचा मुद्देमाल असल्याची माहिती अधीक्षक राठोड यांनी दिली . पहाटेपर्यंत ही कारवाई करून चालकास अटक करण्यात आली आहे .








