नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोदलपाडा ते मेंढवड फाट्या दरम्यान दोन दुचाकींचा समोरा समोर धडक झाल्याने या अपघातात दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दोघा जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावर मोदलपाडा ते मेंढवड फाट्या जवळ आज दि.१५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अक्कलकुवा तालुक्यातील हुनाखांब येथील गिरीष बावा वसावे व विक्रम रावल्या वळवी हे दोन्ही जण मोटरसायकल( क्र.एम. एच.39, ए.के. 2243 ) इच्याने अक्कलकुव्या कडून नंदुरबारकडे जात होते. तर समीर वळवी व सोहम महेंद्र वळवी हे मोटारसायकल (क्र एम.एच.39 , एफ. 4138) ने मोदलपाड्याहून मेंढवळकडे जात होते. दरम्यान नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील मोदलपाडा ते मेंढवड फाट्या दरम्यान समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली.या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले.या चारही जखमींना तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान उपचारादरम्यान समीर वळवी रा. मोदलपाडा, ता.तळोदा, सोहम महेंद्र वळवी, मेंढवळ, ता.तळोदा यांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला, तर गिरीष बावा वसावे व विक्रम रावल्या वळवी या दोघाची प्रकृती देखिल चिंताजनक असल्याने सांगण्यात येत आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, सहायक पो.उपनिरीक्षक अमितकुमार बागुल, सहायक पो.उपनिरीक्षक अविनाश केदार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.








