नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या १२ वर्षांपासून शासन नियमाप्रमाणे लागू असलेली कालबद्ध पदोन्नती व पदोन्नती लागू न केल्याने तसेच इतर मागण्यांसाठी आरोग्य कर्मचारी महासंघातर्फे जि. प. समोर उपोषणा बसले आहेत. एकीकडे हर घर दस्तक अभियान राबविले जात आहे.त्यात आरोग्य कर्मचारी उपोषणाला बसल्याने अभियानावर त्याचा फरक पडणार आहे.याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य कर्मचारी आंदोलनात सहभागी नसल्याचे सांगितले होते.मात्र त्याचे म्हणणे फोल ठरवत शेकडो कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
जि.प.आरोग्य विभागातील सर्व संवर्गातील आरोग्य कर्मचाऱ्यांना तब्बल एक तपापासून म्हणजेच १२ वर्षांपासून शासन निर्णयाप्रमाणे देय असलेली कालबद्ध पदोन्नती व पदोन्नतीचा लाभ तसेच सन २००५ पासून DCPS / NPS धारक कर्मचाऱ्यांना त्यांच्या जमा रक्कमेचा हिशोब देण्यात येत नाही, यातील असलेला घोळ दूर होण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रॉव्हिडंट फंड धारक कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा असलेल्या रक्कमेचा २-३ वर्षापासून हिशोबाच्या पावत्या दिलेल्या नाहीत. यापूर्वी ज्यांना पावत्या देण्यात आल्या त्यांच्या हिशोबाचा ताळमेळ लागत नाही, ज्यांनी प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज घेतले नाही त्यांच्या खात्यावर कर्ज दाखविण्यात येतात, वेतन देण्याच्या कायद्यानुसार दरमहा १ तारखेला पगार होणे आवश्यक असतांना देखील पगार २० तारखेनंतरच केले जातात, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी तसेच सणासुदीला आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सक्तीने कामे करून घेणे तसेच कोविड लसीकरणाच्या नावाखाली वेळीअवेळी कर्मचाऱ्यांची होत असलेली मुस्कटदाबी, लसीकरणाच्या ठिकाणी नर्सेस भगिनींच्या सुरक्षतितचे काय ?
या व इतर मागण्यांसाठी गेल्या १ वर्षापासून महासंघ मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वारंवार भेटून, विनंती करून, निवेदने देऊनही त्यांनी प्रत्येक वेळेस आश्वासने दिलीत पण प्रत्यक्षात एकही आश्वासन पाळण्यात आलेले नाही. कर्मचाऱ्यांना न्याय नाकारण्याचीच भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे.
एकंदर अशा प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खासदार हिनाताई गावित व महासंघाला ठोस आश्वासन दिल्याने २३ ऑगस्ट पासूनचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. त्यावेळेस देखिल दिलेले आश्वासन न पाळल्याने महासंघाने इशारा दिल्याने २८ ऑक्टोबर २०२१ ही तारीख आरोग्य कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची अंतिम तारीख मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महासंघाला दिली होती.
परंतु २८ तारखेला देखील कर्मचाऱ्यांना न्याय मिळालेला नसल्याने महासंघातर्फे
जिल्हा परिषदे समोर आरोग्य कर्मचारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे अंतिम, निर्णायक व ऐतिहासिक असल्याने महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे हे स्वतः बेमुदत उपोषणाला बसले आहेत. कालबद्ध पदोन्नती व पदोन्नतीचे तसेच इतर मागण्यांचे आदेश हातात घेतल्याशिवाय उपोषणाची सांगता होणार नाही असे चिटणीस सतीश जाधव यांनी सांगितले.
दरम्यान हर घर दस्तक अभियान राबविले जात आहे.त्यात आरोग्य कर्मचारी उपोषणाला बसल्याने अभियानावर त्याचा फरक पडणार आहे.याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य कर्मचारी आंदोलनात सहभागी नसल्याचे सांगितले होते.मात्र त्याचे म्हणणे फोल ठरवत शेकडो कर्मचाऱ्यांरी आंदोलनात सहभागी झाले.








