तळोदा | प्रतिनिधी
नुकत्याच गोवा येथे संपन्न झालेल्या १० वी ज्युनियर आणि सिनियर राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग स्पर्धेत तळोदा शहरातील चार खेळाडू यांनी राष्ट्रीय पातळीवर दोन सुवर्ण, एक रजत व दोन कांस्यपदक पटकावित घवघवीत यश संपादन केले.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, तळोदा शहराध्यक्ष योगेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण चौधरी, अभिजीत कलाल, सतिश वळवी, प्रविण वळवी, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र भोई आदींच्या उपस्थितीत सदर राष्ट्रीय पातळीवरील विजेत्या खेळाडूंचे कौतुक करून सत्कार करण्यात आला.
यात हितेशी कमल परदेशी हिने बेल्ट रेसलिंग स्पर्धेत सुवर्णपदक, तर मास रेसलिंग कास्यपदक, संदीप गोकुळ शेलार याने बेल्ट रेसलिंग स्पर्धेत रजतपदक, भूषण शिवाजी जाधव याने मास रेसलिंग सुवर्णपदक, कुशल योगेश माळी याने बेल्ट रेसलिंग स्पर्धेत कास्य पदक पटकावित घवघवीत यश संपादन केले.
सदर राष्ट्रीय स्पर्धेतील पात्र खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडू सौ.दिपाली साळुंके-शिंदे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंची पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे तळोदा परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.








