नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस दलाचे सुत्रे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी स्विकारल्यानंतर विविध कारवाया करण्यात येत आहे. यात रहदारीस अडथळा ठरणार्यांविरूध्दही कडक पाऊले उचलत गुन्हे दाखल करण्यात येत आहे. असे असतांना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यासमोर पोलीसांनी पकडलेला ट्रक गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभा आहे. त्यामुळे नागरीकांना मोठया प्रमाणावर रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. सामान्य नागरीकांवर कारवाई करणारे पोलीस दलामुळेच अनेक दिवसांपासून गैरसोय होत असल्याने नागरीकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर विविध गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्यानंतर कोंबीग ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारांवर कारवाई केली. मागील वर्षाच्या तुलनेत नुकतेच पोलीस अधिक्षकांनी मासिक गुन्हे आढावा बैठकीत यावर्षी रस्त्या अपघातामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली असून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्यमध्ये वाढ झालेली आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी विशेष मोहिम आखून जिल्हाभरात दारू पिवून वाहन चालविणार्या ४२ मद्यपी वाहन चालकांविरूध्द गुन्हे दाखल करून त्यांचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यासोबत नागरीकांच्या सुरक्षितेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे, असे त्यांनी आवाहन केले होते. त्यानुसार रहदारीस अडथळा निर्माण करणार्या विरूध्दही पोलीस दलातर्फे कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात असे सखारात्मक चित्र दिसत असतांना नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या बाबतीत विरोधाभास दिसून येत आहे. नंदुरबार शहरापासून दिड कि.मी. अंतरावर नंदुरबार-भालेर रस्त्यावर नंदुरबार तालुका पोलीस ठाणे स्थलांतर झाले आहे. त्याठिकाणी तालुका पोलीसांनी एका ट्रकवर कारवाई ती पकडली होती. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस ठाण्यासमोरून जाणार्या नंदुरबार भालेर रस्त्यावर ही ट्रक उभी आहे. नंदुरबार ते भालेर रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे मोठया प्रमाणावर नागरीकांची या वाहनामुळे गैरसोय होतांना दिसत आहे. या उभ्या असलेल्या ट्रकमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस दल रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी लॉरीधारक, रिक्षाधारक यासह सामान्य नागरीकांवर कडक कारवाई करते. तर एकीकडे पोलीसांमुळेच नागरीकांना रहदारीस अडथळा होत आहे. हे विरोधाभासाचे चित्र गेल्या अनेक दिवसांपासून शेकडो नागरीक अनुभवत आहे. पोलीस दलाच्या या कारणाम्याविरूध्द नागरीकांमध्ये मोठया प्रमाणावर नाराजी पसरली आहे. पोलीस दलाच्या विरोधात नागरीक कोणाकडे तक्रार करावी. असा प्रश्न त्यांना पडला आहे. याबाबतीत या घटनेची माहिती मिळाल्यास पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील निश्चितच या रहदारीच्या अडथळयापासून सामान्य नागरीकांची सुटका करतील. असा विश्वास दबक्या आवाजात नागरीक व्यक्त करीत आहेत.








