नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासकीय सेवानिवृत्त वेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे दाखले 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली जगताप यांनी केले आहे.
निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची नोव्हेंबर महिन्यात हयातीबाबत नियतकालीक ओळख पडताळणी दरवर्षी करण्यात येते. जिल्हा कोषागार कार्यालयाने निवृत्तीवेतन, कुटूंब निवृत्ती वेतन धारकांचे नाव, निवृत्तीवेतन क्रमांक व बँक खाते क्रमांक असलेले मुद्रीत दाखले संबंधित बँक शाखेत उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे निवृत्तीवेतन धारकांनी स्वत: बँकेत जाऊन दाखल्यावर स्वाक्षरी करावी. अन्यथा निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतन डिसेंबर 2021 पासून रोखून धरण्यात येईल याची निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी.
निवृत्ती वेतनधारकांनी आयकर कपातीचे कागदपत्र सादर करावे
नंदुरबार जिल्हा कोषागारातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी सन 2021-2022 ची आयकर परिगणना व आयकर कपात करण्यासाठी विहीत बचतीचे कागदपत्रे जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे 20 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली जगताप यांनी केले आहे.








