तळोदा l प्रतिनिधी
बोरद गावाजवळील लाखापुर ते बोरद रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्यात यावा अशी मागणी पंचायत समिती सदस्य चंदन पवार यांनी पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तळोदा तालुक्यातील बोरद येथिल आरोग्यवर्धिनी केंद्राच्या उद्घाटन समयी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आले होते. यावेळी जि.प.अध्यक्ष ॲड.सीमा वळवी, आ.राजेश पाडवी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी,समाज कल्याण सभापती रतन पाडवी उपस्थित होते. यावेळी माजी सभापती शांताबाई पवार व पं. स.सदस्य चंदन पवार यांनी आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका व लाखापुर रस्त्यावर असलेल्या बोरद गावाजवळील नाल्यावर पूल व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती.या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यात म्हटले होते की, गेल्या वीस वर्षापासून बोरद लाखापूर तसेच परिसरातील नागरिकांची गावाजवळील नाल्यावर पूल व्हावा अशी मागणी आहे.याअनुषंगाने स्थानिक पत्रकारांनी देखील या संदर्भात वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले आहे.परंतु याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. वास्तविक लाखापुर बोरद, गोंडाळे, धनपूर, ध्वजापाणी आदी गावातील नागरिक हे बोरद येथे मुख्य बाजारपेठ असल्याने नेहमीचं येत असतात. तसेच बोरद येथे माध्यमिक शाळा व महाविद्यालय असल्यामुळे मुलांना देखील शिक्षणासाठी यावे लागते. त्यासाठी या नाल्यावर पूल होणे अत्यंत गरजेचे आहे .अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.यावेळी पालकमंत्री ऍड .पाडवी यांनी आपण त्वरित आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे. निवेदन देते वेळी पं.स. सदस्य चंदन पवार ,ग्रा.पं. सदस्य मंगेश पाटील, इस्माईल तेली आदि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री ॲड.पाडवी यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत ,जनसामान्यांची अडचण लक्षात घेऊन बोरद येथिल आरोग्यवर्धिनी केंद्राला दुसऱ्या च दिवशी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे परिसरातील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या असून आता बोरद-लाखापुर रस्त्यावर पूल लवकर तयार व्हावा,अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.








