नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचलित इंग्रजी माध्यमाच्या द फ्युचर स्टेप स्कूलमध्येश्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजक उपक्रम उत्साहात पार पडले. बालगोपालांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर कृष्णमय झाला होता.
काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव पाटील, कार्याध्यक्ष विजय बोरसे व उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भालेरच्या सरपंच कविता पाटील, प्राध्यापक एम. आर. पाटील व पी. एस. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीकृष्ण पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण, राधा व गोपिकांची आकर्षक वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधले. मोरपिसांचा मुकुट, बासरी आणि पारंपरिक पोशाखातील चिमुकल्यांमुळे शाळेत जणू गोकुळ अवतरल्याचा अनुभव आला.
शिक्षक-शिक्षिकांनी सादर केलेली ‘श्रीकृष्ण-सुदामा’ नाटिका विशेष आकर्षण ठरली. यातून मैत्री, प्रेम, आपुलकी व समानतेचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला आकर्षक सेल्फी पॉईंट व पाळणा हेही उत्साहाचे केंद्र ठरले.
यानंतर ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषात दहीहंडी फोडण्यात आली. विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य करत जल्लोष केला. दहीहंडीच्या या सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या आनंदात आणखी भर पडली. भारतीय संस्कृती, परंपरा व संस्कारांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल पाटील यांनी केले, तर आभार उमेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








