नंदुरबार | प्रतिनिधी
अल्पवयीन मुले तसेच युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याशी जवळीक निर्माण करणे, लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व छायाचित्रे तयार करून त्याआधारे धमकावणे, अशा गंभीर प्रकाराचा नंदुरबार शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी रायसिंगपुरा परिसरातील २२ वर्षीय चेतन प्रकाश कोळी याला पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. संशयिताच्या मोबाईलमध्ये अल्पवयीन मुले व युवकांशी संबंधित अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आली आहेत. प्राथमिक तपासात २०२२ पासून आतापर्यंत ५० पेक्षा अधिक बालक व युवकांना त्याने लक्ष्य केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शहर पोलिसांना संशयिताकडून अल्पवयीन मुले व युवकांचे लैंगिक शोषण केले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. दरम्यान, ६ ऑगस्ट रोजी संशयित एका अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी नंदुरबार शहरालगतच्या भोणे फाटा परिसरातील पपईच्या शेतात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली.
माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून पोलिसांनी साध्या वेशात परिसरात सापळा रचला. संशयित घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला घेरले. पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चेतन कोळी याला पथकाने ताब्यात घेतले.
संशयिताला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पंच आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. यावेळी मोबाईलमधील गुप्त फोल्डरमध्ये अल्पवयीन मुले व युवकांशी संबंधित अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळून आली. फॉरेन्सिक पथकाने या डिजिटल पुराव्यांचे जतन केले असून, त्याआधारे तपासाला वेग देण्यात आला आहे.
संशयित लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत संबंधितांना दबावाखाली ठेवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. २०२२ पासून त्याने अशा प्रकारे अनेकांना लक्ष्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. सध्या संभाव्य पीडितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, संशयिताच्या मोबाईलमधील डिजिटल सामग्री, संपर्कातील व्यक्ती आणि सोशल मीडिया खात्यांच्या आधारे पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८ (३), ३५१ (२), तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ आणि बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे, राजेंद्र कटके, अमित भरवाड, आनंदा मराठे आणि पोलीस शिपाई निंबा वाघमोडे यांच्या पथकाचा कारवाईत सहभाग होता.
संशयिताने २०२२ पासून ५० पेक्षा अधिक बालक व युवकांना लक्ष्य केल्याचा प्राथमिक तपासात संशय असून, या प्रकरणातील संभाव्य पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
— अश्विनी सानप, जिल्हा पोलीस अधीक्षक








