नंदुरबार l प्रतिनिधी-
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, माजी खासदार डॉ.हिना गावीत तसेच रोहिणी खडसे यांच्याविषयी समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या कथित आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक ऑडिओ क्लिपप्रकरणी संबंधित व्यक्ती विजय वसंत चौधरी यांच्यावर तातडीने व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने नंदुरबार येथे भव्य शांततापूर्ण जाहीर निषेध मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
मोर्चामध्ये महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तीन राज्यांतील लेवा पाटीदार गुजर समाजातील माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समाजाच्या एकजुटीचे व सामाजिक बांधिलकीचे दर्शन या मोर्चातून घडले.
मोर्चाची सुरुवात प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) परिसरातून करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धनंजय गोकटे यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फतही संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या कथित ऑडिओ क्लिपची निष्पक्ष, सखोल व वेळेत चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अशा प्रकारच्या महिलांविरोधातील बदनामीकारक वक्तव्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशीही मागणी करण्यात आली.
प्रशासनाच्या वतीने सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई न झाल्यास समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या वतीने व्यापक लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
संपूर्ण मूक मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध, शांततापूर्ण व संयमी वातावरणात पार पडला. समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला सन्मान, सामाजिक ऐक्य आणि न्यायाच्या मागणीसाठी एकमुखी भूमिका मांडली.








