आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड
नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा परिसरात घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्यीय सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मध्यप्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ८ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १४ चोरीच्या दुचाकी आणि १ लाख ४८ हजार रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे. या कारवाईमुळे ८ घरफोडी व ७ दुचाकी चोरीचे असे एकूण १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे मासिक गुन्हे आढावा बैठकीत निदर्शनास आल्यानंतर पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला.
दरम्यान, १३ जून रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लोणखेडा परिसरात सापळा रचण्यात आला. त्यावेळी विनानंबर काळ्या रंगाच्या युनिकॉर्न दुचाकीवरून येणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे सुक्राम कंगरसिंह वास्केल (२२, रा. झाई, ता. कुक्षी, जि. धार, मध्यप्रदेश) व संजय सुमलसिंह वसुनिया (२२, रा. बुराडिया, ता. कुक्षी, जि. धार, मध्यप्रदेश) अशी सांगितली.
सखोल चौकशीत आरोपींनी शहादा परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने नंदुरबार, अमरावती व मध्यप्रदेशात घरफोडी आणि दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले. आरोपींनी चोरीच्या दुचाकी शहादा येथील कारखाना परिसरात लपवून ठेवल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ६ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या १४ दुचाकी जप्त केल्या.
तपासादरम्यान आरोपींकडून १ लाख ४८ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच आरोपी संजय वसुनिया याच्याविरुद्ध गुजरात राज्यात मालमत्तेविरुद्धचे ९ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, या टोळीचा आणखी एक साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार तसेच पोलीस अंमलदार पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, शोएब शेख, भरत उगले, सचिन वसावे, मोहन ढमढेरे आणि सतीश घुले यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.









