नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थिनींच्या आरोग्याशी व जीवाशी खेळण्याचा कथित कट उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत वादातून विद्यार्थिनींच्या जेवणात किंवा पिण्याच्या पाण्यात अपायकारक द्रव मिसळण्याबाबतचे कथित संभाषण असलेली ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
सध्या सुट्ट्यांचा कालावधी असला तरी वैद्यकीय तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या २२ विद्यार्थिनी महिला वसतिगृहात वास्तव्यास आहेत. याच विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. वैयक्तिक वादातून निरपराध विद्यार्थिनींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर समाज कल्याण विभागाने तातडीने दखल घेत संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त केले.
घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थिनींनी प्रथम महिला वसतिगृहात सुमारे तीन तास आंदोलन केले. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन सुरू केले. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विद्यार्थिनींनी दिला. या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना तसेच काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला.
आंदोलनात सहभागी झालेल्या प्रज्ञा थोरात यांनी, “आमच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. अशा प्रकरणात केवळ सेवामुक्ती पुरेशी नाही. दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी केली. तर विद्यार्थिनी सविता थोरात यांनी, “आम्ही शिक्षणासाठी वसतिगृहात राहतो. आमच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे. आमच्या जेवणात किंवा पाण्यात काहीतरी मिसळण्याचा विचार होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे विशाल सामुद्रे यांनीही या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. समाज कल्याण अधिकारी सुंदरसिंग वसावे यांनी घटनेची पुष्टी करत विभागाने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला तातडीने सेवेतून मुक्त केल्याची माहिती दिली. विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळण्याचे कटकारस्थान समोर आल्यानंतर विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात रात्र उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली असून आणखी दोन संशयित फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
व्हायरल ध्वनिफितीची सत्यता, विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचा कथित प्रयत्न कितपत गंभीर होता आणि या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा उलगडा पोलीस व प्रशासकीय चौकशीनंतर होणार आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी केली आहे.
*अधिवेशनात नंदुरबार प्रकरणाची दखल*
मंगळवारी विद्यार्थिनींच्या ठिय्या आंदोलनानंतर नंदुरबार येथील कथित विषप्रयोग प्रकरणाची दखल थेट विधिमंडळाच्या अधिवेशनात घेण्यात आली. विधानपरिषदेत आमदार चित्रा वाघ यांनी विद्यार्थिनींना विष देण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप उपस्थित केला. त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, या प्रकरणी संबंधित कंत्राटी महिला कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.









