नंदुरबार l प्रतिनिधी-
प्रकाशा परिसरातून गुजरातकडे अवैध विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर शहादा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत तब्बल **९० लाख २९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये विविध कंपन्यांच्या विदेशी मद्याचा साठा तसेच २५ लाख रुपये किमतीचा कंटेनर ट्रक जप्त करण्यात आला असून चालक व क्लिनरला अटक करण्यात आली आहे.
शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, प्रकाशा दुर्गक्षेत्र हद्दीतून अशोक लेलंड कंपनीचा कंटेनर ट्रक (क्रमांक RJ-32-GC-0812) अवैध विदेशी मद्याची वाहतूक करीत आहे. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सपोनि संदीप वाघ तसेच गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर देसले, पोलीस हवालदार दीपक चौधरी, पोलीस शिपाई भगवान सावळे व कपिल मंदील यांना कारवाईचे आदेश दिले. यानुसार पथकाने सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता प्रकाशा परिसरात सापळा रचून संशयित कंटेनर अडविला. वाहनाची चौकशी केली असता चालकाने सुरुवातीला कंटेनरमध्ये कुरिअरचे सामान असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने वाहन शहादा पोलीस ठाण्यात आणून पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली.
तपासणीत कंटेनरमध्ये **रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग, मॅजिक मुव्हमेंट ग्रीन अॅपल, मॅजिक मुव्हमेंट जामुन स्पाईस मिंट, स्मिरनॉफ, रॉकफोर्ड क्लासिक, ब्लेंडर्स प्राईड, ब्लॅक अँड व्हाईट, सिंगल्टन मॉल्ट स्कॉच, डिवर्स ब्लेंडेड स्कॉच, जेमसन ब्लॅक बॅरल, अॅब्सोल्युट, मंकी शोल्डर व जॉनी वॉकर ब्लॉन्ड** या विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला.
पोलिसांनी सुमारे ६५ लाख २९ हजार २०० रुपये किमतीचे विदेशी मद्य आणि २५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलंड कंटेनर ट्रक असा एकूण ९० लाख २९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी चालक नरेशकुमार रामभज कश्यप (वय ३८) व क्लिनर मनिराम सुंदर कश्यप (वय ३७, दोघेही रा. भासपदमका, ता. पदौडी, जि. गुरुग्राम, हरियाणा) यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९१/२०२६ नोंद करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८, २१७, ३(५) तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ मधील कलम ६५(ई)(अ), ८०(२), ८९ व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस शिपाई भगवान रामदास सावळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर देसले करीत आहेत.
ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील चंद्रशेखर देसले, दीपक चौधरी, भगवान सावळे व कपिल मंदील यांनी यशस्वीपणे पार पाडली.









