गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप
नंदुरबार l प्रतिनिधी
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेतील पशुवधगृहासंदर्भातील विषयाचा पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांनी सोमवारी नगरपालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधकांवर टीका केली. “गोवंश हत्या बंद करो, बंद करो”, “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत भाजप नगरसेवकांचा आक्षेप हा निव्वळ प्रसिद्धी मिळविण्याचा स्टंट असल्याचा आरोप करण्यात आला.
नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. सभेच्या अजेंडावरील विषय क्रमांक ६ हा नगरपालिकेच्या जुन्या पशुवधगृहाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार दुरुस्ती व सुधारणा करण्याबाबत विचारविनिमय करण्याचा होता. मात्र, या विषयावर भाजपच्या विरोधी नगरसेवकांनी आक्षेप घेत सभात्याग केला.
यानंतर सभा संपल्यानंतर शिवसेना नगरसेवकांनी नगरपालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. विषयाचा योग्य अर्थ न समजून घेता विरोधकांकडून खोटे आरोप केले जात असून, हा केवळ प्रसिद्धीसाठीचा प्रयत्न असल्याची टीका उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी यांनी केली.
या आंदोलनात पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक किरण रघुवंशी, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक कुणाल वसावे, आरोग्य सभापती प्रीतम ढंडोरे, नगरसेवक गौरव चौधरी यांच्यासह शीतल पटेल, भरत चौधरी, भूषण नेरे, जय रघुवंशी, जितेंद्र मराठे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
गोवंश हत्येला आमचाही विरोध – नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी
यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी स्पष्ट केले की, “आम्हीही हिंदू असून गोवंश हत्येला आमचा ठाम विरोध आहे. मात्र विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने सत्ताधाऱ्यांवर निराधार आरोप करून राजकारण केले जात आहे. नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होऊ नये.








