नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील करणखेडा ते गुजरजांबोली रस्त्यावर शेत मोजणीच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला . या वादात तलवार व लोखंडी रॉडने वार केल्याने दोन्ही गटातील पाच जणांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून दोन्ही गटातील १६ जणांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , किस्मत कमरोद्दीन शेख ( रा . बालाजीवाडा , नंदुरबार ) व मनिष हितांशू पटेल यांच्यात शेत मालकीच्या हक्कावरुन कोर्टात दावे दाखल आहेत . किस्मत शेख व साक्षीदार वसंत शंकर चौधरी हे शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे करणखेडा ते गुजरजांबोली रस्त्यावर गेले होते . वसंत चौधरी हे वाहनाने किस्मत शेख यांना सोडून वाहनात बसले होते . यावेळी मनिष हितांशू पटेल , शितल हितांशू पटेल , लाला एकनाथ पटेल , पप्पू जगन्नाथ पटेल व त्यांच्यासोबत असलेले पाच ते सहा जणांनी वसंत चौधरी यांना हाताबुक्यांनी मारहाण केली . तसेच मनिष पटेल याने तलवारीने वार केला असता तो वसंत चौधरी याने चुकविला . शितल पटेल याने लोखंडी रॉडने वसंत चौधरी यांच्या मानेवर मारुन दुखापत केली . तसेच मोबाईल व वाहनाचे नुकसान केले . याबाबत किस्मत शेख यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात सुमारे १० संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देविदास सोनवणे करीत आहेत . तसेच मनिष हितांशू पटेल यांनी परस्पर फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की , शेत मोजणीच्या कारणावरुन शेख किस्मत कमरोद्दीन शेख याने तलवारीने मनिष पटेल यांच्यावर वार केला असता तो चुकविला . वसंत चौधरी याने साक्षीदार संदिप पाटील यांच्या पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण केली . दिनेश प्रकाश पटेल व इतर तिघा इसमांनी मनिष पटेल व संदिप पाटील यांना हाताबुक्यांनी मारहाण केली . याबाबत मनिष पटेल यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत .








