नंदुरबार l प्रतिनिधी-
अल्पवयीन १३ वर्षीय बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी रायसिंग माल्या काथुड (वय ३३) यास २० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
डोगळीफळी, घोडजामने (ता. नवापुर) येथे वास्तव्यास असताना आरोपीने ओळखीचा गैरफायदा घेत बालिकेला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेऊन जिवे मारण्याची धमकी देत ३ ते ४ वेळा अत्याचार केले. या प्रकारानंतर बालिकेची प्रकृती खालावल्याने ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले.
या प्रकरणी बालिकेच्या पालकांनी चौकशी केल्यानंतर सत्य समोर आले. त्यानुसार नवापुर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७६ (२), ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.
तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी सहकाऱ्यांसह शास्त्रोक्त तपास करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. पीडित बालिका, तिचे पालक, वैद्यकीय अधिकारी तसेच डीएनए तपासणी अहवाल हे पुरावे निर्णायक ठरले. यानंतर मुदतीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांच्या न्यायालयात झाली. पुरावे व साक्षीदारांच्या आधारे आरोपी दोषी ठरवत न्यायालयाने भादंवि कलम ३७६ (२) (फ), ३७६ (२) (एन), ३६३ (अ), ५०६ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षातर्फे अॅड. व्ही. सी. चव्हाण यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते यांच्यासह पोलीस पथकाने विशेष मेहनत घेतली.
या निकालाबद्दल पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन व जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी यांनी संबंधितांचे अभिनंदन केले.








