नंदुरबार l प्रतिनिधी-
भालेर येथील का. वि. प्र. संस्था संचालित द फ्युचर स्टेप स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, संस्थेचे सचिव भिका पाटील, भटा पाटील, अभिमन्यू पाटील, देविदास पाटील, विजय पाटील सिंदगव्हाणचे पालक प्रतिनिधी म्हणून विजय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भौतिक शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ सी . व्हि. रमण यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते फीत कापून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनात नर्सरी ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान संकल्पनांवर आधारित आकर्षक व उपयुक्त उपकरणे आणि मॉडेल्स तयार केली होती. शिक्षकांनी विज्ञानावर आधारित प्रयोग सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने व आत्मविश्वासाने विविध मनोरंजक प्रयोगांचे सादरीकरण केले.
उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, जिज्ञासा आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित होत असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.








