नंदुरबार l प्रतिनिधी-
वाढत्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्यामुळे पर्यावरण व मानवी आरोग्यास धोका निर्माण होत असताना त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ई-कचरा जनजागृती व संकलन अभियान राबविण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन शाळेच्या प्राचार्या सुषमा शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट कौन्सिल व पूर्णम इकोविजन फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “ई-यंत्रण 2026” या उपक्रमांतर्गत शाळेत ई-कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व सुरक्षित विल्हेवाटीचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी घरातून ई-कचरा संकलित करून शाळेत जमा केला.
यावेळी मार्गदर्शन करताना शाळेच्या प्राचार्या सुषमा शाह यांनी ई-कचऱ्यातील शिसे, पारा, कॅडमियम यांसारख्या घातक घटकांमुळे होणारे पर्यावरणीय धोके स्पष्ट केले. ई-कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने वर्गवारी व पुनर्चक्रण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ई कचरा संकलन मोहिमेत सर्वांनी सक्रिय होण्याची आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग नोंदवला. या अभियानाचे संयोजन विज्ञान विषय शिक्षक राजेंद्र मराठे यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी असे उपक्रम भविष्यातही राबविण्यात येणार असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापक प्रशांत बागुल, पर्यवेक्षिका सीमा पाटील, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी, नितीन देवरे, नरेंद्र सूर्यवंशी, महेश पाटील, प्रतिभा साळुंखे, हर्षिता पाटील, जगदीश वंजारी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








