नंदुरबार l प्रतिनिधी-
राष्ट्रीय लोकअदालतीच्या निमित्ताने आज (१३ डिसेंबर २०२५ ) रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये तडजोडपात्र प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीद्वारे नागरिकांना जलद, सुलभ व खर्चविरहित न्याय मिळाला.
या राष्ट्रीय लोकअदालतीच्या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर आर. पेठकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. एच. कर्वे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सतीश टी. मलिये, मुख्य न्यायदंडाधिकारी के. ए. नहार, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सौ. ए. एस. वानखडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेंद्र बी. पाटील, तसेच दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. डी. भिर्डे, आर. बी. सुर्यवंशी व एच. वाय. पठाण, नंदुरबार जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. सावंत वळवी, सचिव अॅड. सारंग गिरनार, सहसचिव अॅड. मोहनसिंग गिरासे यांच्यासह जिल्ह्यातील विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या लोकअदालतीत संपूर्ण जिल्ह्यातून एकूण ४११ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली असून, या प्रकरणांतून एकूण ₹२,८२,६३,७२९ रुपयांची तडजोड करण्यात आली आहे.
लोकअदालतीदरम्यान पती-पत्नी वादाच्या पाच प्रकरणांमध्ये तडजोड होऊन संबंधित जोडप्यांचा संसार पुन्हा सुरू झाला. या तडजोडीसाठी दोन्ही बाजूंच्या विधिज्ञांनी सहकार्य केले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर आर. पेठकर यांनी संबंधित पक्षकारांचे अभिनंदन केले.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रबंधक डी. पी. सैंदाणे, अधिक्षक जे. वाय. सानफ, अधिक्षक जी. यू. भामरे, न्यायालयीन कर्मचारी तसेच विधिज्ञांनी मोलाचे सहकार्य केले.
लोकअदालतीमुळे न्यायालयांवरील ताण कमी होऊन नागरिकांना त्वरित न्याय मिळत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.








