नंदुरबार l प्रतिनिधी
शहराचा सर्वांगीण विकास हाच शिवसेनेचा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा राहणार आहे. एकंदरीत या शहराचा विकास आमच्या नेतृत्वाखालीच झालेला आहे. शिवसेनेच नेतृत्वच या शहराचा विकास करू शकते असा आत्मविश्वास नागरिकांना असल्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने निवडणुकीला सामोरे जात आहोत. दरम्यान, स्थानिक अंतर्गत राजकीय वादामुळे महायुतीवर परिणाम होईल असे भाष्य किंवा आरोप,प्रत्यारोप एकमेकांवर करू नये असे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.
शिवसेना भवन,आमदार कार्यालयात निवडणुकी संदर्भात माहिती देण्यासाठी मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली त्याप्रसंगी आ.रघुवंशी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पुढे ते म्हणाले, नंदुरबार तळोदा नगरपालिका निवडणुकीत पूर्ण क्षमतेने शिवसेनेने उमेदवार दिलेले आहेत. नवापूर आणि शहाद्यात मित्र पक्षाची भूमिका शिवसेना बजावीत आहे. नवापुरात 4 उमेदवार शिवसेनेचे उभे केले आहेत शहाद्यात आघाडीच्या माध्यमातून 6 उमेदवार शिवसेनेने उभे केले. यावेळी जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी सभापती कैलास पाटील उपस्थित होते.
*भाजप गटबाजीचा फायदा शिवसेनेला*
पत्रपरिषदेत आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले,नंदुरबार, शहाद्यात शिवसेनेसोबत भाजपाचे आव्हान आहेच पण बीजेपी सारखी शिवसेनेत गटबाजी नाहीये. त्याच्या पुरेपूर फायदा शिवसेनेलाच होईल. तळोद्यात भाजपच्या 4 संभाव्य उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या त्यातील एका उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. भाजपचे प्रांतनेते शशिकांत वाणी, माजी उपनगराध्यक्ष अजय परदेशी, योगेश चौधरी यांना उमेदवारी दिली नाही. त्यातील योगेश चौधरी यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी केली आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा फायदा दोन्ही पालीकांमध्ये शिवसेनेला होणार आहे.
*पूर्ण क्षमतेने उमेदवार दिले*
भाजपचे काही नेते शिवसेने सोबत युती करण्यासाठी प्रयत्न करत होते. पण, नंतर चर्चा फिस्कटली. नंदुरबार,तळोदा नगरपालिका निवडणुकीत पूर्ण क्षमतेने शिवसेनेने उमेदवार दिली असून,भगवा फडकवण्याच्या निर्धार शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.







