नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र शासनातर्फे भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांसाठी नाशिक येथे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे असे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) निलेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासनातर्फे नवयुवक व नवयुवतीसाठी 03 नोव्हेंबर 2025 ते 12 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे सेवा निवड मंडळ (SSB) 63 व्या सत्राचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन देण्यात येणार आहे.
जिल्ह्यांतील इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीसाठी येतांना शैक्षणिक प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकेच्या मूळ प्रती, डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (DSW) यांच्या वेबसाईटवरून एसएसबी (SSB) 63 कोर्ससाठीचे प्रवेशपत्र आणि परिशिष्टांच्या दोन भरलेल्या प्रती आणाव्यात.
*पात्रतेसाठी निकष*
एसएसबी वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांकडे खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे:
• कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) उत्तीर्ण होऊन सर्विसेस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतीसाठी पात्र असावे.
• एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले असावे आणि एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.
• टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीचे कॉल लेटर असावे.
• युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे किंवा शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
याबाबत अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक ईमेल पत्ता training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हाटसअॅप क्र. 9156073306 अथवा कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क करावा असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.