नंदुरबार l प्रतिनिधी-
अक्कलकुवा तालुक्यातील वडफळीं, पिंपळखूंटा, जांगठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 5 जणांवर निलबंनाची कारवाई करण्यात आली असून 16 आरोग्य कर्मचाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावड़े यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील चापडी येथील रमिलाबाई उबड्या वळवी ( वय ३८ ) यांना ३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विषारी सपाने दंश केला . शेतातून त्यांना घरी आणण्यात आले . त्यानंतर त्यांचे पती उबड्या वळवी यांनी त्यांना गावापासून जवळ असलेल्या वडफळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले . मात्र केंद्र कुलूप बंद होते . तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकही कर्मचारी उपस्थित नव्हते . त्यामुळे जवळपास कर्मचाऱ्यांची शोधाशोध केली मात्र जवळपास कोणीच मिळून न आल्याने अखेर बाइक अॅम्ब्युलन्सने रमिलाबाईला पिंपळखुंटा प्राथमिक
आरोग्य केंद्रात नेण्यात आले . मात्र पिंपळखुंटा प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकारी नसल्याने केंद्रात असलेल्या परिचारिकेने रुग्णाला मोलगी ग्रामीण रुग्णालयात रेफर केले . येथेही योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णाला पुन्हा बाइक अॅम्ब्युलन्सने मोलगी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात येत होते . अखेर मोलगीपासून ३ ते ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बिजरीगव्हाण गावाजवळ रस्त्यातच रमिलाबाई यांचे निधन झाले होते.
याबाबत अनेक बातम्या प्रकाशित झाल्या तसेच पंचायत समिति गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांचा कड़े तक्रार ही करण्यात आली होती. जिल्ह्य आरोग्य अधिकारी यांचा आदेशानुसार सहायक जिल्ह्य आरोग्य अधिकारी यांची नियुक्ति करुण चौकशी समिति नेमण्यात आली होती. चौकशीअंती प्रथमिक आरोग्य बंद असल्याने व आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने ती महिला दगावली असे समोर आले. या चौकशीत अनेक कर्मचारी दोषी आढळून आले होते. यात 22 कर्मचारी दोषी आढळले याबाबत चौकशी समिती तसेच गट विकास अधिकारी यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कड़े अहवाल सादर केले होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दि. 18 ऑक्टोंबर रोजी कारवाई करत प्राथमिक आरोग्य केंद्र वडफळीं 1 आरोग्य अधिकारी, 1 औषध निर्माण अधिकारी , पिंपळखूंटा 1 औषध निर्माण अधिकारी, जांगठी 1 आरोग्य अधिकारी, 1 औषध निर्माण अधिकारी यांच्यासह कारवाई करीत या 5 जणांना निलबंन केले तर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील 16 कर्मचाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती अक्कलकुवा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी दिली.








