नंदुरबार l प्रतिनिधी
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जगातील सर्वात उंच असा 74 मीटर लांब भगव्या ध्वजाचे अनावरण विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शिवपट्टन किल्ला, खर्डे येथे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नंदुरबार येथील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी यांना जिल्ह्यातून विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला.

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेनुसार, राज्यातील 36 जिल्ह्यांसह इतर 6 राज्यांत 12 हजार किलोमीटर प्रवास करून स्वराज्य यात्रा काढण्यात आली होती. यात्रेत 96 धार्मिक स्थळांच्या भेटीत संत पीठातील संतांकडून ध्वजाचे पूजन करण्यात आले होते.
राज्याबाहेरील श्रीराम जन्मभूमी (अयोध्या) मथुरा, बोधगया, केदारनाथ, उत्तराखंड, आग्रा किल्ला, अजमेर शरीफ, श्रीमंत सयाजीराव गायकवाड संस्थान (बडोदा) आदी ठिकाणी ध्वज पूजा विधीसाठी नेण्यात आला होता. ध्वज पुन्हा परतल्यावर कर्जत आणि जामखेड मधील गावागावात नेण्यात आला. या भगव्या ध्वजाची उंची 74 मीटर असून, त्याचे वजन 90 किलो आहे. छत्रपती शिवराय यांनी जसे 18 पगड जातीला घेत स्वराज्य स्थापन केले अगदी त्याच विचाराने आ. रोहित पवार यांनी हा ध्वज ज्या खांब्यावर फडकला आहे त्याचे वजन 18 टन आहे. स्वराज्य ध्वज हा एक विचार असून, कायम सर्व समाज व धर्माला समभाव ठेवण्याच्या संदेश देत राहील असे आ. रोहित पवार यांनी सांगितले. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी यांना विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला.








