नंदुरबार l प्रतिनिधी
प्रकाशा येथे विविध शहर व ग्राम लेवा पाटीदार ग्लोबल गुजर मंडळ यांनी गुर्जर समाजातील पारंपरिक भजन, गण-गवळणी, रास, लळित उत्सव आर्दीची ओळख, संवर्धन व जतन करण्यासाठी आयोजित केलेल्या भजन महोत्सव समारंभात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचा सत्कार समस्त गुजर समाजाच्या वतीने करण्यात आला.
रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदान शिबिरासह पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षांच्या ३०० रोपांचे वाटपही या महोत्सवात करण्यात आले. गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे , उद्योजक शशिकांत पाटील, निझर येथील समाजाचे महामंत्री जगदीश पाटील, सद्गुरू धर्मशाळेचे चेअरमन मोहन चौधरी, नंदुरबार येथील डीवायएसपी संजय महाजन यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातील एकूण २९ भजनी मंडळांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते सहभागी सर्व भजनी मंडळांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या उपक्रमात सदगव्हाण, तळवे, चौपाळे, वडोदरा, कोळदा, निझर, पातोंडा, कोरीट, प्रकाशा, सुरत, म्हसावद, पिंपरी, विद्याविहार, दामळदा, थानोरा, शहादा, थुरखेडा, वाका येथील भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात राज्यातील गावांमधील मंडळांनीही सहभाग घेतला. यावेळी दोडे गुजर समाजाचे माजी अध्यक्ष डायाभाई पाटील, जि. प.च्या माजी सभापती हेमलता शितोळे, भागवताचार्य रवींद्र पाठक, अॅड. प्रभाकर चौधरी, दिलीप पाटील आदींनी भेट दिली.