नंदुरबार l प्रतिनिधी
संसद रत्न डॉ. हिना गावित यांनी खासदार असताना नंदुरबार जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या माध्यमातून संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यामुळे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील साक्री व शिरपूर तालुक्यासह नंदुरबार जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना इमारत नाही किंवा मोडकळीस आली आहे, अशा ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे.
पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना नवीन पंचायत भवन, ग्रामपंचायत इमारत आणि नागरी सुविधा केंद्र बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी डॉक्टर सुप्रिया गावित या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना तत्कालीन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी ग्रामपंचायतींना नवीन इमारत मंजूर करण्यात यावी अशी मागणी केली होती. डॉक्टर सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो प्रस्ताव आणि ग्रामपंचायतींची यादी पुढे पाठवल्यानंतर डॉक्टर हिना गावित यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला होता. यातील काही गावांच्या ग्रामपंचायत इमारतींना २० ते २५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. त्यामुळे त्या गावांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. परिणामी अशा गावांनाही नव्याने इमारती मंजूर झाल्या असल्याने संबंधित गावांमधील कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
यात नंदुरबार तालुक्यातील दुधाळे, साक्री तालुक्यातील ककाणी भ., शेलबारी, कढरे, मांजरी, छड्वेल प., शिरपूर तालुक्यातील गधडदेव, बभळाज, जळोद, बलकुवे, हिसाळे, शहादा तालुक्यातील लोणखेडा, प्रकाशा, सारंगखेडा, मोहिदे त. श., कंसाई, मोगरा, वडाळी , पाढळदा बु., शिरूडदिगर, वडगांव, सुलतानपूर, तोरखेडा, कहाटुळ, अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी, भगदरी, खडकी, काठी, डनेल, धडगाव तालुक्यातील कात्री, नवापूर तालुक्यातील खानापुर, नागझरी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.