नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात “एक पेड माँ के नाम” अभियाना अंतर्गत वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष दिंडीच्या पूजनाने झाली.
विद्यालयाच्या प्रांगणातून वृक्षदिंडीला प्राचार्य आर.एच.बागुल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. वृक्षदिंडी भालेर, नगाव व तिशी गावातून काढण्यात आली. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाविषयी जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्रातील साधुसंतांचे विद्यार्थ्यांनी सजीव देखाव्याचे वेशभूषा धारण केली होती. विद्यार्थ्यांनी पारंपरिक गांधी टोपी, सदरा, घोतर,
हातात टाळ आणि मृदंग असा वारकरी पेहराव धारण केला होता.
तर विद्यार्थिनींनीही पारंपरिक नऊवारी साडी नेसून दिंडीत सहभाग घेतला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘वृक्ष लावा, पाऊस वाढवा’ अशा घोषणांद्वारे संदेश देत वृक्षारोपणासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली. मुलामुलींनी पर्यावरणावर गीत सादर करून समाजात सकारात्मक पर्यावरणाविषयी संदेश दिला. तसेच मुलांनी पर्यावरण जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले. मुलींनी “माऊली माऊली” या गीतावर सामूहिक टाळ नृत्य सादर केले. उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात या कार्यक्रमाला दाद दिली. वृक्षदिंडीची सांगता विद्यालयाच्या प्रांगणात झाली.
“एक पेड माँ के नाम” उपक्रमाअंतर्गत वृक्षदिंडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहेरचे उपसरपंच गजानन पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून तीसीचे लोक नियुक्त सरपंच दिलीप पाटील होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व व
पर्यावरणातील त्यांचे स्थान किती महत्त्वपूर्ण आहे हे पटवून दिले. कार्यक्रमास नानाभाऊ पाटील, काशिनाथ पाटील, विजय पाटील,अशोक खंडागळे,किरण शिंदे कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.डी.एन.सोलंकी यांनी केले.