आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे
नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा जोमाने उभा राहतो आहे. शाहू, फूले व आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षात धर्मनिरपेक्ष विचार असलेल्या घटकांना ताकद दिली जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत कार्यकर्त्यांनी सतर्कतेच्या भूमिकेतून काम करावे. या पक्षात कार्यकर्त्यांना सन्मानपुर्वक वागणूक दिली जाईलच. निवडणूकांमध्ये कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देण्याचेही काम केले जाईल. काँग्रेसच्या राजवटीत संविधान दिवस कधीच साजरा झाला नाही मात्र महायुती सरकारमध्ये संविधान दिन साजरा करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हयातील आदिवासी डोकारे सहकारी साखर कारखान्याच्या समस्या बैठकीतून सोडवू. तसेच जिल्हयातील महत्वाच्या प्रकल्पांना ताकद देण्याचे काम केले जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाटमंदिरात आयोजित पक्षाच्या आढावा बैठकीसह कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला.
या मेळाव्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे, युवक अध्यक्ष सुरज चव्हाण, कल्याण आखाडे, राज्य सरचिटणीस लतिफभाई तांबोळी, माजी मंत्री आनंद परांजपे, सामाजिक न्याय विभाग सेल अध्यक्ष सुनिल मगरे, विद्यार्थी आघाडीचे प्रशांत कदम, वाहतूक सेल प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव, प्रदेश सरचिटणीस रणजित नरोटे, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, उमविच्या विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे, जिप चे माजी अध्यक्ष भरत गावित, जिप चे माजी सदस्य रतन पाडवी, जिल्हाउपाध्यक्ष मोहन शेवाळे, ज्येष्ठ माधव चौधरी, जिल्हयाचे युवक अध्यक्ष सिताराम पावरा, महिला जिल्हाध्यक्ष सिमा सोनगरे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र नगराळे,सौं संगीता गावित, धनंजय गावित आदी मान्यवर उपस्थित होते.
खा सुनील तटकरे म्हणाले की,
ज्या ज्या वेळी पक्ष मजबूत करायचा असतो त्या त्यावेळी याच जिल्हयातून प्रचाराचा नारळ फोडण्याची परंपरा माजी पंतप्रधान इंदिराजींपासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत कायम आहे. नंदुरबारला ऐतिहासिक अशी राजकीय पार्श्वभूमी आहे. इथला आदिवासी स्वाभिमानाने कष्ट करून शेती करतो. या जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा त्याच ताकदीने वाढत आहे, याचा आनंद आहे. भरत गावित यांना विधानसभेत पराभव पत्करावा लागला, परंतू त्यांनी खचून न जाता पुढच्या निवडणूकीच्या तयारीला लागावे. काही जण या पक्षाला सोडून गेले. ते का सोडून गेले हे मी खोलात जाऊन सांगणार नाही. पक्ष हा विशिष्ट्य विचारांवर चालत असतो. त्याच विचारांवर आस्था ठेवून इथले कार्यकर्ते समरसतेने काम करीत आहेत. ही ताकद येत्या निवडणूकामध्ये निश्चितच दिसेल. निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले जाईल.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, विरोधकांनी लाडकी बहिण योजनेवर कितीही टीका केली तरी ही योजना कधीच बंद होणार नाही., असे मी आपणास आश्वस्त करते.
अनिल पाटील म्हणाले. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री व पालकमंत्री पद मिळाले.हे अजित दादा पवार व खा सुनील तटकरे यांच्यामुळे शक्य झाले. आमच्या खानदेशात सर्व जण तापीचे पाणी पितात. त्यामुळे आमचे विचार जुळतात. येत्या जि प. पं स निवडणूकांमध्ये जादूई आकडा पार करायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कसा फडकेल, पासाठी सर्वांनी प्रयल करायचा आहे. ताकदवान कार्यकर्त्यांचा निवडणूकीत विचार केला जाईल, अशा वेळेस महायुतीचाही विचार केला जाणार नाही. त्यावेळेस माफी मागून घेवू. विधानसभा निवडणूकीत सहकारी पक्षाने धक्का दिला तो धक्का आता सहन केला जाणार नाही., असेही त्यांनी शिंदे सेनेचे नाव घेता सांगितले.
सुरज चव्हाण, भरत गावित यांनी यावेळी मार्गदर्शन केले. डोकारे सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा त्यांनी मांडला.
डॉ अभिजित मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून त्यांनी जिल्हयाचा आतापर्यंतचा आढावा मांडला. सुत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले तर नरेंद्र नगराळे यांनी आभार मानले.
सर्व मान्यवरांचे आदिवासी पारंपारीक पध्दतीने सत्कार करण्यात आला. गर्दी पाहून सर्वांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या संघटन कौशल्याचे कौतुक केले. यावी इंजिनियर जेलसिंग पावरा, मालती वळवी,खलिल खाटीक, चांगदेव वळवी, ज्ञानेश्वर ठाकरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जगदीश जयस्वाल,मोहन माळी, संतोष पराडके, छोटू कुंवर, मोंटू जैन, राजेंद्र बाविस्कर, वैशाली चौधरी, प्रकाश पवार, सुरेंद्र कुवर, मदन ठाकरे, संगीता पाडवी, दीपा कलाल आदींनी परिश्रम घेतले.