नंदुरबार तालुक्यातील दरोड्यातील चौघांना अटक
नंदुरबार l प्रतिनिधी
सुजलोन कंपनीच्या टॉवर मधून केबल लंपास करणाऱ्या दरोडयातील चौघांना स्थानिक गुन्हे शाखेचे ताब्यात घेतले आहे.
दि. 26 जून 2025 रोजी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फिर्यादी नितीन माधवराव धनगर रा. कोकणी हील, नंदुरबार हे सुझलॉन कंपनीचे टॉवर येथे सेक्युरिटीची ड्युटी करीत असतांना 08 ते 10 अज्ञात इसमांनी पायी पायी सदर ठिकाणी चेहरे झाकुन येत फिर्यादी व साक्षीदार अशांना धारदार शस्त्र दाखवुन त्यांचेकडील 8 हजार 500 रुपये रोख रक्कम तसेच एका टॉवर वरील 72 हजार 920 रुपये किमतीचे कॉपर केबल, पॅनल असा मुद्देमाल जबरीने चोरी करुन अंधाराचा फायदा घेत पळ काढला होता, त्यावरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे भा.न्या. संहिता कलम 310(2), 351(2)(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील काही आरोपी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील बलवंड येथील असुन ते गावातच आहेत,
याबाबत खात्रिशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने बलवंड येथे जाऊन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने शोध घेतला असता तेथे गुन्हयातील 4 आरोपी हे मिळुन आले. पवन ऊर्फ प्रशांत युवराज कोळी रा. रजाळे ता.जि. नंदुरबार (सराईत आरोपी), राज ऊर्फ भटू भास्कर हटकर रा. शनिमांडळ, ता. जि. नंदुरबार, अजय हिम्मत भिल रा. बलवंड, ता.जि. नंदुरबार,निलेश आनंदा पानपाटील रा. बलवंड ता.जि. नंदुरबार यांना स्था.गु.शा. पथकाने लागलीच ताब्यात घेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे उर्वरीत साथीदारांबाबत विचारता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले, तरी सदर गुन्हयातील उर्वरीत आरोपी फरार असुन त्याबाबतचा पुढील अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि मुकेश पवार, पोहेकॉ मुकेश तावडे, दादाभाई वाघ, ज्ञानेश्वर पाटील, मोहन ढमढेरे पोकों अभय राजपुत अशांनी केली आहे.