नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात कोणीही बेघर राहू नये यासाठी आम्ही कायमच दक्षता घेतली आणि विक्रमी संख्येत घरकुलांना मान्यता मिळवून मोठ्या प्रमाणात बेघरांना न्याय दिला आणि आता जागे झालेले काही आमदार घरकुल लाभार्थ्यांचे कैवारी बनून बैठकांचा फार्स करीत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या घरकुल योजनांवर मागील काही वर्षांपासून आमचे काम चालू असताना आणि जनतेला न्याय देणे चालू असताना जिल्ह्यातील हे अन्य आमदार कुठे होते? अशा शब्दात माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
नंदुरबार जिल्ह्यात विविध घरकुल योजनेतून आतापर्यंत दिलेल्या लाभाची माहिती देण्यासाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित, तळोदा येथील माजी सैनिक रूपसिंग पाडवी, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य उपस्थित होते.
त्याप्रसंगी काही पत्रकारांनी जिल्ह्यातील चार आमदारांनी घरकुल योजना विषयी आढावा घेण्यासंदर्भाने तसेच नागरिकांचे प्रश्न मांडण्याच्या संदर्भाने संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली असल्या बाबत प्रश्न विचारले. त्या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, ती बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः बोलावलेली नाही त्यामुळे मला त्याचे निमंत्रण असल्या नसल्याचा प्रश्न उद्भवत नाही.
याप्रसंगी डॉ. विजयकुमार गावित यांनी घरकुल योजनांची विस्तृत माहिती देताना सांगितले की, माझ्या मंत्री पदाच्या काळात तसेच डॉ. हिना गावित यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात नंदुरबार जिल्ह्यात कोणीही बेघर राहू नये याची विशेष दक्षता घेतली. पंतप्रधान आवास योजना असेल, शबरी घरकुल योजना असो, रमाई घरकुल योजना असो किंवा ओबीसींची मोदी आवास योजना असो या विविध योजनांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ मिळवून दिला. त्यांनी पुढे सांगितले की, 2016 ते 2025 या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात 2 लाख 57 हजार 876 घरकुल मान्यता देण्यात आली. त्यातील एक लाख 14 हजार 9997 पूर्ण झाले आहेत. काही तांत्रिक कारणास्तव बेघर अर्ज धारकांना घरे मिळू शकली नव्हती त्यांचा प्रश्न लोकसभेत मांडून डॉक्टर हिनाताई गावित यांनी ड यादीच्या माध्यमातून सुमारे 1 लाख 33 हजार 81 घरकुल मंजूर करून दिले. मोदी आवास योजनेतून 2876 घरकुले मंजूर करून दिली आहेत. 2016 ते 2025 या कालावधीत शबरी घरकुल योजनेतून 194 घरकुल देण्याचे उद्दिष्ट होते त्यापैकी घरकुल निर्माण समितीकडून 15,320 घरकुल उभारणीला मंजुरी मिळाली होती त्यापैकी 11133 घरकुले पूर्ण झाली आहेत.
घरकुलांबाबत नगरपालिका उदासीन का?
घरकुलांच्या कामाला वेग मिळावा यासाठी मागच्या दोन वर्षात नंदुरबार प्रकल्प कार्यालयाला 17. 5 कोटी रुपये तर तळोदा प्रकल्प कार्यालयाला तळोदा प्रकल्प कार्यालयाला 17 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती देताना आज डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नगरपालिका क्षेत्रातील घरकुलांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले प्रत्येक शहरातील बेघरांना सुद्धा घरकुल मिळावे या प्रयत्नातून प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात सुद्धा घरकुल मंजूर करण्यात आले परंतु प्रत्येक नगरपालिकेने त्यांच्याकडे आलेल्या बेघरांच्या अर्जामध्ये त्रुटी काढून ते प्रलंबित ठेवले असून अद्याप पर्यंत लाभ दिलेले नाहीत.
नगरपालिकांची उदासीनता अनाकलनीय असल्याचे नमूद करून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जे आमदार एकत्र येऊन आता घरकुलांसाठी जिल्हा परिषदेत बसणार आहेत त्यांनी आतापर्यंत आपल्या शहरातील या घरकुल वाटपाबाबत काय दक्षता घेतली हे जनतेपुढे स्पष्ट करायला हवे असे डॉक्टर गावित म्हणाले.
*तळोद्यातील घरकुले जहागीर जमिनीच्या वादामुळे प्रलंबित; तथापि पर्यायी जागा देऊन न्याय देणार*
तळोदा येथे सुमारे 1500 घरकुले मी मंजूर करून दिली पण, तळोदा येथे बारगळ जहागीरदार यांच्या मालकीच्या जमिनी असल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना घरे नावावर करून मिळत नाही त्याचप्रमाणे घरकुलांसाठी जागाही उपलब्ध होत नाही. हे खरे आहे परंतु बारगळ यांच्याशी बोलणी करून घरकुलांसाठी मी त्यांना राजी केले होते. जमीन मोजणीचा खर्च बारगळानी करावा की सरकारने करावा; हा गुंता सुटत नसल्यामुळे घरकुल प्रलंबित आहेत. असे असले तरी त्या लाभार्थ्यांना न्याय देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, घरकुलासाठी वेगळी जागा उपलब्ध करून देता येईल किंवा बारगळ यांना पर्यायी जमीन देता येईल का? यावर माझे प्रयत्न सुरू आहेत, असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले.
चौकशीच्या मुद्द्यावरही लगावला टोला
आपल्या जिल्ह्यात ज्यांनी महिलांच्या नावावर घरकुल घेतले त्याच कुटुंबातील व्यक्तींनी पुरुषांच्या नावावर देखील घरकुल मिळवले असे गैरप्रकार निदर्शनास आले त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून घरकुल साठी आलेल्या अर्जांची बारकाव्याने तपासणी करणे सुरू आहे आणि ज्यांनी चुकीचे दोन-दोन लाभ घेतले त्यांना हुडकणे सुरू आहे. लोकप्रतिनिधी असताना देखील हा गैरप्रकार करणाऱ्या व्यक्ती सुद्धा यातून सुटणार नाहीत त्यांची चौकशी सुरू आहे; अशी माहिती देतानाच डॉक्टर विजयकुमार गावित एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले की, गायकवाड समितीची चौकशी चुकवण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला; हे सांगणे तदन चुकीचे आहे. मी भाजपात प्रवेश केला तेव्हा सत्ताधारी पक्षाचा मंत्री होतो आणि भाजपा हा तेव्हा सत्ताधारी पक्ष नव्हता. ती चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या आमदार खासदाराने पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे पूर्ण माहिती ठेवली पाहिजे; असाही टोला डॉक्टर गावित यांनी लगावला.
दरम्यान, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी जिल्ह्यातील प्रत्येक बेघराला घरकुल देण्यासाठी आपण बांधील असून प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले तसेच कोणत्याही लाभार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही असे ठामपणे सांगितले.