नंदुरबार l प्रतिनिधी
शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने आज ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन नंदुरबार जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त जिल्हा क्रीडा संकुलाच्या इनडोअर हॉलमध्ये सकाळी ७ वाजता विशेष योग कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन, शिक्षण विभाग आणि एस. ए. मिशन कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सुमारे ३५० विद्यार्थी, पोलिस कर्मचारी आणि नागरिकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, क्रीडा अधिकारी ओमकार जाधव, संजय बेलोरकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार, मीनल वळवी, खुशल शर्मा, सतीश सदाराव, तसेच महेंद्र वसावे, गणेश ईशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी योग शिक्षिका तेजस्विनी चौधरी यांनी मार्गदर्शन करत विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद दीक्षित यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता समापन प्रार्थनेने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी विद्यार्थ्यांना योगाचे आरोग्यदायी फायदे पटवून देत त्याचे नियमित पालन करण्याचे आवाहन केले.