नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात पावसाळी आपत्तीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी आपली कामे वेळेत पूर्ण करावी तसेच आपत्ती व्यवस्थापनात कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल, अशा सूचना आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिल्या आहेत.
त्या आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अनय नांवदर (तळोदा), निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे (नंदुरबार), मयुर वसावे (शहादा), जिल्हा शल्य चिकित्सक के.डी. सातपुते, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सी.के. ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी रविंद्र सोनवणे, सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. सेठी म्हणाल्या, गोमाई व प्रकाशा पुलाची कामे प्राधान्याने पूर्ण करावित. गोमाई पुलावर आपत्ती घडल्यास संबंधित विभागावर कारवाई करण्यात येईल. तसेच गोमाई पुलावरील वाहतुक व्यवस्थापनासाठी मोठे सिमेंट्चे अवरोधक बसवून वाहतुक वळविण्यात आल्याचे मोठे दिशादर्शक फलक तेथे लावावेत.
प्रत्येक नगरपालिका प्रशासनाने पावसाच्या पाण्याचा निचरा तात्काळ होण्यासाठी ड्रेनेज प्रणाली सुव्यवस्थित राहतील यासाठी उपाययोजना कराव्यात. ड्रेनेज साफ करण्यासाठी 100 टक्के त्यांचे मॅपिंग करुन कार्यवाही करावी. आपत्तीच्या कामात काही अडचणी येत असल्यास त्या प्रशासनाच्या त्वरीत निदर्शनास आणून द्याव्यात, म्हणजे त्या त्वरीत सोडविण्यात येतील.
पूरप्रवण भागात संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष केंद्रीत करावे. तालुक्यातील प्रत्येक गट विकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक गावातील 2 व्यक्तींना आपत्तीचे प्रशिक्षण द्यावे. ग्रामपंचायत स्तरावर वीज प्रतिबंधक यंत्रणा उभारण्यात याव्यात. शाळा, आश्रमशाळा, निवासी यासारख्या ठिकाणांवर पूराचे पाणी शिरुन आपत्ती होवू नये यासाठी संबंधित विभागांनी तेथे संरक्षण भिंती आहेत किंवा नाही याची त्वरीत खात्री करुन कार्यवाही करावी.
आपत्कालीन कक्ष, मदत पथके, आपदा मित्र, व टोल फ्री क्रमांक हे सर्व संबंधित यंत्रणांकडे असणे गरजेचे आहे. आपत्ती उद्भवल्यास करावे लागणारे स्थलांतर, जनावरांचे व्यवस्थापन, धान्य पुरवठा, औषधोपचार, जेवणाची व्यवस्था याबाबत संबंधित विभागाने योग्य नियोजन करावे. विद्युत विभागाने आपत्तीत जास्त काळ विद्युत पुरवठा बंद राहणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच दुरुस्तीची कामे असल्यास ती त्वरीत पूर्ण करुन घ्यावित. नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याबरोबरच आपत्ती घडल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे. जेथे नुकसान झाले आहे तेथील पंचनामे त्वरीत करुन संबंधितांना त्वरीत मदत मिळेल यासाठी उपाययोजना कराव्यात.
*जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त म्हणाले…*
आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होणारी गांवे तसेच तापी काठावरील बाधित होणारी गांवे या गांवाच्या सरपंच, ग्रामसेवक यांना आपत्ती निवारणाचे साहित्य देण्यात यावे. धडगांव-अक्कलकुवा रस्त्यावर दरडी कोसळत असतात त्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात. प्रत्येक विभागाने आपत्तीत आपल्या विभागाला काय काय करावे लागते याचा योग्य अभ्यास करुन सतर्क रहावे, असे यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस. यांनी सांगितले.