नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अत्यावश्यक सुरक्षा संच व गृहपयोगी वस्तुंचे (भांडे संच) वितरणाचा शुभारंभ आज दिनांक 25 मे 2025 रोजी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे लाडके नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात. पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्रातील युती सरकारने कामगार विभागाकडील नोंदीत कामगारांना विविध खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजना सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गतच गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अत्यावश्यक सुरक्षा संच व गृहपयोगी वस्तुंचे वितरण केले जात असून गावागावातील ग्रामस्थ गृहपयोगी भांडे संचांचा लाभ घेताना दिसले आहेत. आता पुन्हा ते वाटप सुरू करण्यात आले असून आज दिनांक 25 मे 2025 रोजी त्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शेकडो लाभार्थींनी लाभ घेतला.
वंचित राहिलेल्या ग्रामस्थांनी व नागरिकांनी नोंदणीचा लाभ घ्यावा तसेच विरोधकांच्या भूलथापांना आणि अफवांना कोणीही बळी पडू नये असे आवाहन याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले. गावाचा आणि व्यक्तीचा विकास हेच आमचे ध्येय आहे हे स्पष्ट करताना डॉक्टर विजयकुमार गावित पुढे म्हणाले की, प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्ती आत्मनिर्भर बनावा बेरोजगारांना रोजगार मिळावा बेघरांना घरे मिळावी आणि गृहिणींना गृह उद्योग मिळावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असून शासनाच्या प्रत्येक योजना लोकांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवल्या जात आहेत आणि त्यामुळेच घरकुल गृह उद्योग शेती प्रक्रिया उद्योग तसेच भांडे संच असेल किंवा सुरक्षा संच असेल सर्वाचा लाभ ग्रामस्थांना होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यावेळी आपल्या भाषणात आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी कामगार विभागाच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. कामगार कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भविष्यात अशा योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक पात्र कामगाराने आपले कार्ड तयार ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मा.खासदार डॉ.हिना विजयकुमार गावित यांनी देखील कामगार विभागाच्या योजनांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक महिला आत्मनिर्भर बनावी, हे आमचे उद्दिष्ट आहे असे स्पष्ट करून त्यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकारकडे प्रयत्न करून ड यादी मंजूर करून घेतले आणि घरापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना घरे मिळवून दिली. उज्वला गॅस योजनेतून विक्रमी स्वरूपात गॅस वाटप करीत गरीब महिलांना आधार मिळवून दिला.
कार्यक्रमात मा.डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित यांनी देखील कामगार कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सरकारकडून नवीन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्यात येणार असल्याचे सांगून उपस्थितांना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. हा उपक्रम कामगारांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला असून, भविष्यातही अशा योजनांचा अधिकाधिक लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीचे शेखर पाटील प्रवीण पाटील आणि अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.