नंदुरबार l प्रतिनिधी-
घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याच्या शासकीय निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून आज दिनांक 25 मे 2025 रोजी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते विविध गावांमधील घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यासंदर्भातील पत्राचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील, सागर तांबोळी, राजू मराठे यांच्यासह विविध गावातील सरपंच तसेच प्रशासनातील तहसीलदार मंडल अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, कोणीही बेघर राहू नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य शासनाने घरकुल देण्याची मोठी महत्त्वाकांक्षी योजना आणली आपण नंदुरबार जिल्ह्यात त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली असून हजारो बेघर लोकांना त्यामुळे घरे मिळू शकली आहेत.
अजूनही त्याचा लाभ देणे सुरू असून ताबडतोब बेघर लोकांनी नोंदणी करावी आणि योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतानाच डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुढे सांगितले की, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मान्यता देण्यात आली आहे.
यापुढे नदी, खाडी पात्रातील वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाइन विक्री ‘डेपो पद्धती’ऐवजी लिलाव पद्धतीद्वारे करण्यात येणार आहे. नैसर्गिक वाळूचे पर्यावरणीय महत्त्व, नैसर्गिक वाळूचा तुटवडा विचारात घेता कृत्रिम वाळूस आता प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातीस विविध शासकीय, निमशासकीय बांधकामांमध्ये पुढील ३ वर्षांत २० टक्के कृत्रिम वाळू वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. लिलावाद्वारे उत्खनन करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाळू गटामधील १० टक्के वाळू विविध घरकुल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.