नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील एका घरातून कृषीविभागाच्या भरारी पथकाने तीन लाख रुपयांचे बनावट एचटीबीटी बियाण्यांची पाकिटे जप्त केल्याची कारवाई केली. याप्रकरणी एकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील अनिल शिंदे याच्या घरात बनावट एचटीबीटी बियाण्याची पाकिटे विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाली होती. यानुसार कृषी विभागाने नियुक्त केलेल्या भरारी पथकाने याठिकाणी धाड टाकली असता, तीन लाख रुपये किंमत असलेली एचटीबीटी बोगस बियाण्याची पाकिटे मिळून आली. विभागाकडून पाकिटे जप्त करुन संबधिताने हा माल आणला, कोठून याची चौकशी करण्यात येत आहे.संशयिताविरोधात रात्री उशिरापर्यंत सुरु होती कारवाई
भरारी पथकाकडून मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून संशयितावर पाळत ठेवण्यात आली होती. संबंधित व्यक्त्ती बियाणे विक्रीसाठी बाहेर पडत असल्याचे दिसून आल्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी अनिल शिंदे याच्याविरोधात नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चेतन कुमार ठाकरे, कृषी विकास अधिकारी किशोर हडपे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी उल्हास ठाकूर यांच्या मार्गदर्शनात विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कल्याण पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके, मोहिम अधिकारी सचिन देवरे, तालुका कृषी अधिकारी योगेश हिवराळे यांच्या पथकाने केली.