नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील हजारो कृषी सहायकांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केले तसेच वेळोवेळी आश्वासने मिळाल्यानंतरही मागणी पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कृषी सहायकांनी आंदोलनाचा बिगुल वाजविला. प्रलंबित मागण्यासाठी नंदुरबार जिल्हा कृषी सहायक यांनी एल्गार पुकारून एक दिवसीय धरणे आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधले. नंदुरबार जिल्ह्यातील कृषी सहाय्यक संघटनातर्फे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या संदर्भात नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करावी, कृषी सहाय्यक पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी सहायकांना लॅपटॉप उपलब्ध करून देणे, ग्राम स्तरावर कामकाजासाठी मदतनीस नियुक्त करावे,
कृषी विभागाचा आकृतीबंध उपलब्ध करुन 4:1 प्रमाण करणे, आदी प्रमुख मागण्याचा समावेश आहे. एक दिवसीय धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष टि.के. वळवी, उपाध्यक्ष मदनलाल कायत, जिल्हा कार्याध्यक्ष सुशीलकुमार पाटील, सरचिटणीस धीरज खैरनार, कोषाध्यक्ष जयपाल गावित, जिल्हा सचिव सचिन दराडे, राज्य प्रतिनिधी सुधीर वाघमारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख निलेश रावताळे, जिल्हा संघटक राकेश पावरा, योगेश मिस्त्री, रमण कोकणी, नंदुरबार तालुका अध्यक्ष नरेंद्र देसले, सुरेश गावित नवापूर, शिलेदार पावरा तळोदा, फिलिप वळवी अक्कलकुवा, मनोहर पावरा धडगाव, चौधरी वसावे शहादा तसेच जिल्ह्यातील कृषी सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.