नंदुरबार l प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद उभी राहिला पाहिजे. कार्यकर्त्यांनी देखील संघटन करावे. नंदुरबारात भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शहादा आणि तळोद्यात युतीच्या माध्यमातून निवडणूका लढवू. परंतु, या ठिकाणी युती न झाल्यास दोन्ही पालिका शिवसेना स्वबळावर लढवेल असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषद सदस्य आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
शहादा येथे शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमानंतर आयोजित सभेत आ. रघुवंशी बोलत होते. तत्पूर्वी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवसेना कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, शहाद्यातील नागरिक आता कंटाळलेले आहेत त्यांना पर्याय पाहिजे.
शहरात तिसरा पर्याय म्हणून शिवसेना असणार आहे. सर्वांनी एकत्र येत एक चांगलं काम राजकारणापलीकडे जाऊन केलं पाहिजे. शिवसेना कार्यालयात अडचणी घेऊन आलेल्या नागरिकांच्या समस्या शिवसैनिकांनी सोडवाव्यात. दर शुक्रवारी नागरिकांच्या समस्या, त्यांची गाऱ्हाणे ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी येऊ.एखाद्या वेळेस ठिकाणी मी नाही येऊ शकलो तर आमचे पदाधिकारी या ठिकाणी असतील. कुठलाही नेता त्याच्या खिशातून जनतेसाठी खर्च करत नसतो. शासनाच्या ज्या काही योजना असतात त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रामाणिक लोकप्रतिनिधींनी करावं.
आमदार आमश्या पाडवी म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री,शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळेस विरोधकांकडून टीका करण्यात आली. योजनेच्या माध्यमातून माता भगिनींना अर्थसहाय्य झालं आहे. शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफी अशा अनेक योजना महायुती सरकारने आणल्या. नागरिकांच्या अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी शिवसेना जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आलं आहे. ज्या ज्या वेळेस नागरिक हाक देतील त्या त्या वेळेस शिवसेना मदतीसाठी धावून येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता जिल्ह्यातील जनतेसाठी २ आमदार दिले आहेत. याप्रसंगी जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मनलेश जयस्वाल यांनी केले.
व्यासपीठावर सह संपर्कप्रमुख लक्ष्मण वाडीले, जिल्हा प्रमुख गणेश पराडके,माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, शिवसेना अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाध्यक्ष परवेज खान, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र पेंढारकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जहीर शेख मुशीर, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील,सुपडू खेडकर, ललित जाट,सागर चौधरी,जगदीश चित्रकथी आदी उपस्थित होते.