नंदुरबार l प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दि.हस्ती को ऑप बँक लि. दोंडाईचा या बँकेच्या नंदुरबार शहरात असलेल्या नंदुरबार शहर शाखा व गिरीविहार शाखा या दोन्ही शाखांतर्फे पात्र तीन गृहकर्जधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनुदान पत्राचे वितरण करण्यात आले.
नंदुरबार येथील दि हस्ती बँकेच्या गिरीविहार गेट शाखेत अनुदान पत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बँकेचे स्थानिक चेअरमन यशवंतराव स्वर्गे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहकर्ज धारकांना अनुदानपत्र देण्यात आले. याप्रसंगी बँक शाखा समितीचे सदस्य धनेश लुनावत, विपुल शाह, अजित गुरूबक्षाणी, शाखा व्यवस्थापक योगेश गोसावी आदी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे स्वत:चे कोणतेही घर नाही, अशा व्यक्तींना स्वत:च्या घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. या अंतर्गत हस्ती बँकेने नॅशनल हौसिंग बँक यांच्याशी करार करून बँकेने हौसिंगसाठी कर्ज वितरण केलेल्या कर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मिळणारी हौसिंग सबसिडीसाठी पात्र असलेल्या लाभार्थी कर्जदारांना सबसिडीचे वितरण ऑनलाईन पध्दतीने कर्ज खात्यात वर्ग करण्यात आले. हस्ती बँकेच्या गिरीविहार शाखेतून लाभार्थी कर्जदार धापुदेवी पेमाराम प्रजापती व पेमाराम सुखाराम प्रजापती, पंकज सुभाष अग्रवाल तसेच शहर शाखेतून प्रल्हाद दत्तात्रय भोपे यांच्या बँक खात्यात अनुदान थेट ऑनलाईन वर्ग करण्यात आले. हस्ती बँक ही कायम विविध प्रकारच्या योजना राबवित असते. त्यात प्रधानमंत्री आवास योजना हस्ती बँकेमार्फत कार्यान्वित करण्यासाठी हस्ती बँकेचे प्रेसिडेंट कैलास जैन, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरीया, सरव्यवस्थापक माधव बोधवाणी, उपसरव्यस्थापक सुनिल गर्गे, माहिती तंत्रज्ञानचे सतिष जैन यांनी प्रयत्न केले. दि हस्ती बँकेने विविध कर्जावरील कमी व्याज तसेच नियम व अटी सरळ व सोपे केलेले आहेत. बँकेचे ग्राहक व सभासदांनी तसेच नविन घर घेणार्या ग्राहकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दि.हस्ती बँक शाखा समिती चेअरमन, सदस्य व नंदुरबार शहरचे शाखा व्यवस्थापक नाना हरी कांगणे व गिरीविहार शाखेचे शाखा व्यवस्थापक योगेश गोसावी यांनी केले.








