नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदुरबारकडे कार्यालयीन कामासाठी जात असताना लहान कळवान गावाजवळ 23 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारा अज्ञात वाहनाने मोटरसायकलीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होण्यासाठी केवळ सहा महिनेच बाकी असतानाच त्यांचा अपघाती निधन झाल्याने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नंदुरबार येथे राहणारे जगदीश बाबूलाल सोनवणे ( वय 57) हे नवापूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. 23 एप्रिल रोजी रात्री पोलीस ठाण्याची बैठक संपवून ते नंदुरबार येथे कार्यालयीन कामासाठी दुचाकीने जात असताना नवापूर तालुक्यातील लहान कळवान गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.धडक एवढी जोरदार होती की मोटर सायकल पासून मयत पीएसआय सोनवणे पंधरा ते वीस फूट अंतरापर्यंत फेकले गेले होते.यात मोटरसायकलीचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी जाऊन अपघात ग्रस्त पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांना तात्काळ उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे हे विसरवाडी पोलीस ठाण्यात पाच वर्ष कार्यरत असल्याने विसरवाडी गावातील नागरिक, नातेवाईक व नाभिक समाज बांधव यांच्या परिचयाचे असल्याने हळहळ व्यक्त करीत रुग्णालयात एकच गर्दी केली.
पोलीस उपनिरीक्षक जगदीश सोनवणे यांच्या अपघाती मृत्यूची बातमी नंदुरबार पोलीस दलात समजतात नंदुरबार पोलीस, नवापूर पोलीस व विसरवाडी पोलीस यांनी रुग्णालयात धाव घेत मयत पीएसआय जगदीश सोनवणे यांचे अंतिम दर्शन घेतले. सोनवणे हे मितभाषी मन मिळवू स्वभावाचे असल्याने अपघाताची बातमी आल्याने सोशल मीडियावर रात्रीच भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेज येऊ लागले. पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होण्यासाठी केवळ सहा महिनेच बाकी असतानाच त्यांचा अपघाती निधन झाल्याने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
यावेळी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार हे रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात उपस्थित होते.
अपघाताची माहिती पीएसआय जगदीश सोनवणे यांच्या परिवाराला कळविण्यात आले त्यांची पत्नी, मुलगा, पोलिस मित्र व नातेवाईक यांनी रुग्णालयात येताच आक्रोश केला.अपघातात मयत पीएसआय जगदीश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
याप्रकरणी लहान कळवान गावातील पोलीस पाटील विनायक गावित यांच्या फिर्यादीनुसार विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.