नंदुरबार l प्रतिनिधी-
हरविलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने ऑपरेशन ‘शोध’ राबविण्यात येणार आहे.यातंर्गत प्रत्येक पोलीस ठाणे व पोलीस उपविभाग स्तरावर पथकाची स्थापना करण्यात आली असून नागरिकांनी हरविलेल्या बालक, महिलांसदर्भात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या क्राईम कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हरवलेल्या महिला व बालकांसंबंधी गांभीर्याने लक्ष घालत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात, अशा पोलीस विभागास स्पष्ट सुचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अश्वती दोर्जे यांच्याकडून राज्यातील प्रत्येक जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यासंदर्भातील परिपत्रक निर्गमित केले आहे. त्याअन्वये जिल्हाभरातील हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचे मार्गदर्शनाखाली तिनही उपविभागात उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पर्यवेक्षणाखाली ऑपरेशन ‘शोध’ मोहिम राबविण्यासाठी पथके तयार करुन त्याचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकाऱ्याकडे देण्यात आले आहे. सोबतच एक सहायक पोलीस निरीक्षक किंवा हवालदार आणि एक पुरुष व महिला अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर पथके ही नंदुरबार जिल्हयातील हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेणार असुन या मोहिमेत महिला व बालकांसाठी काम करणाऱ्या संस्था, बाल कल्याण समिती, महिला व बालकल्याण विकास विभाग, जिल्हा बाल सुरक्षा कक्ष यांचादेखील सहभाग असणार आहे.
जिल्हयाभरात राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन ‘शोध’ मोहिमेचा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांचेकडुन वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असुन जिल्हयातील नागरिकांनी आपले परिचयातील हरविलेले महिला किंवा बालक हे घरी परत आले असल्यास त्यांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष अगर फोनद्वारे कळवावी. तसेच हरविलेल्या महिला व बालकांबाबत काही गोपनीय माहिती असल्यास ती जिल्हा पोलीस विभागास कळवावी, असे आवाहनदेखील पोलीस अधीक्षकांनी केले.