नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा शहरातील मीरा कॉलनीत हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्री नाच गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर एका वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने इको वॅन एका महिलेला धडकल्याने महिलेचा मृत्यू झाला तर चार वर्षे बालिका गंभीर झाली. 21 एप्रिल रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे लग्नाच्या घरातील आनंदाच्या वातावरणात विरजन पडुन क्षणात शोककळा पसरली.
तळोदा येथील मीरा कॉलनीत सोमवारी रात्री एका हळदी समारंभात नाचगाण्याचा आनंदात कार्यक्रम संपल्यावर एक दुर्दैवी घटना घडली. नाशिक येथून आलेल्या इको वॅन (एम.एच.04 के.एल 9853) या वाहनाने एका महिलेस धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव सुलोचना प्रकाश मराठे (वय अंदाजे ५२) असून त्या मूळच्या चिनोदा,ता. तळोदा येथील रहिवासी होत्या.
तर त्यांची ४ वर्षीय नात हिची देखील प्रकृती चिंताजनक आहे..
सदर या कार्यक्रमात रात्री 11ते 12 च्या सुमारास इको वॅन कॉलनीत उभी केली होती. यावेळी हे उभे असणारे वाहन मागेपुढे करण्याच्या प्रयत्न वाहन चालकाकडून सुरू होता मात्र त्यावेळी अचानक त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वॅन समोरच उभ्या असलेल्या सुलोचना मराठे यांना जबरदस्त धडक दिली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. त्याचवेळी वॅनजवळ उभी असलेली त्यांची ४ वर्षीय नात कु. श्रेया सागर मराठे ही चिमुकली देखील या अपघातात जखमी झाली. या सोबतच ५ वर्षीय चिमुरडा, व अन्य २ ते ३ जण जखमी झाले आहेत. काही जणांना उभ्या असलेल्या मंडपाचे खांब देखील लागल्याचे सांगण्यात येत आहे.
सुलोचना मराठे यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. चिमुरडीवर प्राथमिक उपचार सुरू आहेत. वाहनाची गती एवढी होती की, वाहन जवळ असलेल्या घराच्या एका गेटवर जाऊन आदळले व जागीच पलटी झाली. यात वाहनाचे पुढील चाक तुटून गाडी पलटी होऊन दोन्ही बाजूंचे व काचेचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातामुळे लग्नाच्या घरी असणाऱ्या आनंदाच्या वातावरणात विरजन पडुन क्षणात शोककळा पसरली. तेथील स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत केली व पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सुलोचना मराठे यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याच परिसरात असणाऱ्या सभागृहात दुसरे एक देखील लग्न होते मात्र त्या ठिकाणी देखील रात्री घडलेल्या दुःखद घटनांचे पडसाद दिसून आले.