नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार शहरातील तीन सराफ दुकानांवर गुजरात राज्यातील भारतीय मानक ब्युरोच्या टीमने छापा टाकला.यावेळी तीन ज्वेलर्सच्या दुकानातून विना बी.आई एस हॉलमार्क नसलेले तब्बल 969 ग्रॅम सोने जप्त केले असल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली.
नंदुरबार शहरात हॉलमार्कशिवाय सोने विक्री होत असल्याची तक्रार भारतीय मानक ब्युरो विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार सहाय्यक संचालक कुंजन कुमार आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातच्या पथकाने नंदुरबार शहरातील 1) एन.एम. ज्वैलर्स, सोनार खूंट, मरोली चौक, नंदुरबार, 2) एम. एम. ज्वेलर्स, टिळक रोड रोड नंदुरबार,3) मेसर्स कन्हैयालाल विश्वनाथ सराफ (केवीएस) ज्वैलर्स, फड़के चौक, नंदुरबार या तीन सराफांच्या दुकानावर दोन मार्च रोजी दुपारी छापे टाकले. यावेळी छापेमारी दरम्यान एन.एम. ज्वैलर्स येथे 61.38 ग्रॅम, एम. एम. ज्वेलर्स येथे 248.53 ग्रॅम व कन्हैयालाल विश्वनाथ सराफ येथे 659.94 ग्रॅम सोन्याचे दागिने विना बीआईएस हॉलमार्क असल्याचे आढळून आले. पथकाने यातील सराफांकडून एकूण 969 ग्रॅम सोने जप्त केले. स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने हा छापा टाकण्यात आला. या घटनेनंतर नंदुरबार शहरातील सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.