तळोदा l प्रतिनिधी-
स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी पायपिट करत खर्डी येथे धान्य घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब दर महिन्याला साधारण 10 की.मी. पायपीट करावी लागत आहे. पावसाळ्यात पायपीट केल्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे. उन्हाळा किंवा हिवाळ्यात सायकल, दुचाकीवर जाऊन रेशनिंगचे धान्य आणत असतात. फक्त साधारण शंभर रुपयांचे धान्य विकत घ्यायला जीव धोक्यात घालून पायपीट करणारे आदिवासी बांधव आणि महिला भगिनी पहिल्या तर अंगावर काटाच येतो.
केंद्र शासनाने कोरोना काळात उत्पन्नाचे साधन ठप्प झालेल्या गोर- गरिब जनतेसाठी काही महिन्यासाठी मोफत धान्य वाटप योजना जाहीर केली होती. मोफतचे व शंभर रुपयांचे धान्य घेण्यासाठी सातपुड्याच्या दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिक, स्वातंत्र्य मिळूनदेखील 74 वर्षांनंतरही, गाव-पाडा अतिदुर्गम भागातील नागरिक, सातपुड्याच्या कडेकपरीतून रस्ता तुडवत, धान्य आणण्याची कसरत करीत जीवन जगत आहेत. या परिसरातील नागरिक अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचीत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गाव-पाड्यांवर रस्ता नसल्याने दळणवळणाच्या प्रवाहापासून कोसो दूर आहेत. तसेच काही गाव-पाड्यांमध्ये वीज सुद्धा नसल्याने अद्यापही अंधारात जीवन जगत आहेत. त्यात तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बेडवाई हे गाव सुद्धा विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. बेडवाई हे गाव अलवान गृप ग्रामपंचायत अंतर्गत येत असते. ह्या गावांमध्ये साधारण 500 नागरिक रहात आहेत. येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील कुटुंबांना शासनामार्फत मिळणाऱ्या रेशनिंग आणण्यासाठी तब्बल दहा ते पंधरा किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे भयानक चित्र पाहून मन सुन्न होते. ह्या गावांपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने चारचाकी वाहन पोहचत नाही, त्यामुळे सदरील गावांना शासनामार्फत पोहचणारा रेशनिंग हा खर्डी येथील रेशन दुकानदाराकडे पोहचवावा लागतो. व तेथून गावातील नागरिक दरमहिन्याला तब्बल ये-जा करून दहा ते पंधरा किलोमीटर पायपीट करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा जीव मेटाकुटीला आला आहे. दररोज पोटासाठी राब-राब राबणाऱ्या नागरिकांना रेशन आणण्यासाठी तसेच शासनाची सुविधा घेण्यासाठी सुद्धा पायपीट करावी लागते हीच मोठी शोकांतिका आहे.
बेडवाई गावातील नागरिकांना शासनाकडून मिळणाऱ्या निशुल्क प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ आणण्यासाठी खर्डी येथे नदी, दऱ्याखोऱ्यातून, पायवाट तुडवत, शेत शिवारामधून पायी जावे लागत आहे. बंधारा गावापर्यंत पोहचण्यासाठी येथील नागरिकांना अनेक ठिकाणी बोरवान नदी पार करावी लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच मोठं-मोठे दगड, गोटे, खड्डे पार करतांना अनेकांचा पाय घसरून दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनवेळी शासनाकडून मिळणाऱ्या 5 किलो धान्य घेण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्या डोक्यावर धान्य ठेवून प्रवास करीत होता. काही तास पायी प्रवास करून दमल्याने त्याच धान्याच्या गोणीवर विसावा घेताना नागरिक दिसून येतात. विसावा घेतल्यानंतर पुन्हा पुढील अंतर कापण्यासाठी त्याच शक्तीने प्रवास करतांना कुटुंबास मोठी कसरत करावी लागत आहे. आमचे व आमच्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य असेच जाणार की काय अशी भीती त्यांना नेहमी सतावत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
धान्य आणण्यासाठी दऱ्याखोऱ्यातून पायी चालत असतांना अनेक वेळा नागरिकांचा अपघात सुद्धा झाला आहे. अनेक वेळा पायांना जखमा होऊन घरगुती उपचार करून तसाच प्रवास करीत धान्य आणत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशा वेळी रेशनकार्ड धारकांना पॉस मशीनचा अंगठा देण्यासाठी वृद्ध ग्रामस्थांना सुद्धा पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थांतुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे कोरोना महामारीत जनता होरपळली जात असतांना रेशनिंगसाठी दहा ते पंधरा कीलोमीटर पायपीट करावी लागत आहे.
गेल्या 74 वर्षीच्या काळात अनेक आमदार, खासदार व अधिकारी जिल्ह्याला लाभले, परंतु अद्यापही अनेक गाव-पाडे मूलभूत सुविधांपासून लांबच आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ग्रामस्थांना होणारा त्रास कमी करावा. तसेच त्यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी बेडवाई येथील ग्रामस्थांनी केली आहे.








