नंदुरबार l प्रतिनिधी
मृत्युंजय महामंत्र, शिवतांडव स्तोत्र आणि संगीतमय शिव महापूजा तसेच भस्मारतीत नंदनगरीतील हजारो भाविक महादेवांच्या भक्तीरसात तल्लीन झाले होते. तब्बल ३ तास चाललेल्या महापूजेत संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.
नंदुरबार येथे शिवधाम उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने शिव महापूजा व भस्मारतीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजेला सुरू झालेली आरती ९.३० वाजेपर्यंत अखंड सुरू होती.मृत्युंजय महामंत्र, शिवतांडव स्तोत्र यांच्यासह देवाधिदेव महादेवांच्या जप मंत्रोच्चारात पूजेला बसलेल्या हजारो महिला,पुरुष भाविकांना शिवसृष्टीची अनुभूती जाणवली.
कार्यक्रमासाठी स्वतंत्र सभा मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी ५ वाजेपासूनच शहर व परिसरातील शिवभक्तांचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन व्हायला सुरुवात झाली.पंडित सोमेश परसाई यांनी ६.३० वाजेला महापूजेला सुरुवात केली. महापूजेच्या व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख कथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी उपस्थित होते.
पंडित सोमेश परसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सभा मंडपात मातीची पार्थिव शिवलिंग बनवण्यात आली होती. त्या शिवलिंगची महापूजा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांनी केली. त्याचप्रमाणे उपस्थित भाविकांनी देखील आपापल्या घरून मातीची शिवलिंग बनवून आणली होती त्यांनी देखील शिवलिंग ची महापूजा केली. रात्री ९.३० वाजता भस्मारतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी देवाधिदेव महादेवांच्या जयजयकार करण्यात आला.