नंदुरबार l प्रतिनिधी-
“नंदुरबार जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) चा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन व संपूर्ण आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे,” अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिली.
“अक्कलकुवा तालुक्यातील 11 वर्षीय मुलीवर जीबीएसची संशयित रूग्ण नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत ती अतिदक्षता विभागात असून तिची प्रकृती स्थिर आहे,” असेही त्यांनी सांगितले. डॉ. मित्ताली सेठी यांनी स्पष्ट केले की, “जीबीएससारख्या आजारासंदर्भात नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. आरोग्याशी संबंधित कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.”
प्रशासनाची तातडीची पावले…
• “जिल्हाभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.”
• “प्रभावित गावातील पाण्याच्या नमुन्यांची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.”
• “शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 20 खाटांचा अद्यावत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.”
• “संभाव्य रुग्णांसाठी विशेष तपासणी आणि उपचार केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.”
डॉ. मित्ताली सेठी यांनी नागरिकांना आवाहन केले की, “जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्यासाठी सजग राहा, प्रशासनाला सहकार्य करा!” असेही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी म्हटले आहे.