नंदुरबार l प्रतिनिधी-
कुष्ठरोग शोध अभियान व स्पर्श जनजागृती अभियान-2025 अंतर्गत जिल्ह्यातील 31 जानेवारी ते 14 फेब्रवारी, 2025 या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाचे सुक्ष्म नियेाजन करुन हे अभियान यशस्वीपणे राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्हा समन्वय समितीची बैठकीत दिल्या.
कुष्ठरोग शोध अभियान व स्पर्श जनजागृती अभियान-2025 अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. सोनवणे, डॉ. अमितकुमार पाटील, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. श्रीमती सेठी म्हणाल्या, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारी हा कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येतो. जिल्ह्यात 31 जानेवारी 2025 पासून कुष्ठरोग शोध अभियानाचा शुभारंभ केला जाणार असून हे अभियान 31 जानेवारी ते 14 फेब्रूवारी, 2025 पर्यंत चालणार आहे. यासाठी 1 हजार 362 पथके प्रशिक्षित करण्यात आलेले असून प्रत्येक पथकामध्ये एक पुरुष व एक महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या पथकाद्वारे शहरी व ग्रामीण भागातील 17 लाख 72 हजार 527 इतक्या लोकसंख्येची घरोघरी जावून तपासणी करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाचे संशयित म्हणून नोंद घेऊन त्यांची तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करुन निदान झाल्यावर त्यांना मोफत बहुविध औषधोपचार सुरु करण्यात येणार आहे.