नंदुरबार l प्रतिनिधी
भारताचा प्रजासत्ताक दिनाचा 76 वा वर्धापन दिन 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी पोलीस मुख्यालय, नवीन कवायत मैदान नंदुरबार येथे साजरा करावयाचा असून या पार्श्वभूमीवर सर्व विभागप्रमुखांनी आपल्याला नेमून दिलेली कामे वेळेत व नियोजनबद्ध रितीने पार पाडावित, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृह येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी त्या बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजंली शर्मा, अपर उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी बोलतांना म्हणाल्या, पोलीस मुख्यालयातील नवीन कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता होईल. या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालय परिसर संबंधित विभागाने स्वच्छ ठेवावा. मैदानावर मुख्य कार्यक्रम होणार असल्याने मैदानाचे सपाटीकरण, साऊंड सिस्टीम व आवश्यक दुरुस्तीच्या कामाला गती द्यावी. मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. कार्यक्रमाच्या दिवशी आवश्यक पोलीस बँड पथक, पोलीस पथक उपस्थित ठेवावे. पुरस्कार वितरणाची संबंधित विभागाने यादी करावी. शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचा परिसर स्वच्छ ठेवावा. कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी, चहापानाची व्यवस्था करावी. तसेच मुख्य शासकीय समारंभास आलेल्या निमंत्रित तसेच मान्यवरांच्या बसण्याची व्यवस्था करावी.
.
शिक्षण विभागाने मुख्य शासकीय समारंभाकरीता सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करीत त्याचा नियमितपणे सराव करून घ्यावा. त्याचप्रमाणे मुख्य शासकीय समारंभ कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा गौरव व हुतात्मा स्मारक समिती सदस्य, दलित मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती, स्थानिक राजकीय पक्षाचे प्रमुख, पत्रकार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीं, शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे प्रमुखांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.